रायगडावर आठ दिवसांपासून अंधार

| महाड | प्रतिनिधी |

स्वराज्याची राजधानी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा आणि शिवराज्याभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा अनुभवलेला किल्ले रायगड सध्या प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे अंधारात बुडाला आहे. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसमाधी, मेघडंबरी आणि राजसदर परिसर गेल्या तब्बल आठ दिवसांपासून अंधारात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ऐतिहासिक वारशाच्या ठिकाणी सलग आठ दिवस प्रकाश व्यवस्था बंद असूनही संबंधित यंत्रणेकडून दखल घेतली जात नसल्याने शिवभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

स्थानिक पातळीवर मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणची वीज मीटरपर्यंत उपलब्ध आहे. मात्र, मीटरनंतर जाणाऱ्या वीजपुरवठ्याच्या अंतर्गत लाईनमध्ये बिघाड झाल्याने शिवसमाधीसह परिसरातील दिवे बंद असल्याचे स्थानिक लाईनमनशी संपर्क साधल्यानंतर स्पष्ट झाले. मीटरनंतरची अंतर्गत विद्युत व्यवस्था तपासणे आणि बिघाड दुरुस्त करण्याची जबाबदारी संबंधित पुरातत्व विभागाची असल्याचे सांगण्यात येत आहे.

किल्ले रायगड परिसरातील हॉटेल चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर देशमुख यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधले. त्यानंतर रायगडाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शिवसमाधीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी सलग आठ दिवस अंधार असताना त्याची दखल घेणारे अधिकारी कुठे आहेत? किल्ले रायगडाला वाली कोण? असा संतप्त सवाल आता शिवप्रेमींकडून केला जात आहे. पुरातत्व विभागाने तातडीने वीजपुरवठ्यातील बिघाड शोधून प्रकाश व्यवस्था पूर्ववत करावी, तसेच रायगडावर जबाबदार अधिकाऱ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.दरम्यान, पुरातत्व विभागाचे अधिकारी संकेत कववकर यांच्याशी संपर्क साधण्याचे वारंवार प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यांनी फोन न उचलल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Exit mobile version