धमक्यांच्या ई-मेलने रायगड अलर्ट मोडवर!

जिल्हा न्यायालयासह अन्य न्यायालयांतील सुरक्षेत वाढ; बॉम्बशोधक पथकाकडून कसून तपासणी

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांना बॉम्बस्फोट घडवून उडवून देण्याच्या धमक्या ई-मेलद्वारे मिळाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणाही अलर्ट मोडवर आली असून, सोमवारी (दि. 2) अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात पोलिसांसह बॉम्बशोधक व नाशक पथकाने कसून तपासणी केली. न्यायालयाचा परिसर रिकामा करून प्रत्येक विभागाची बारकाईने तपासणी करण्यात आली. सुदैवाने तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. मात्र, राज्यभरातील न्यायालयांना मिळालेल्या धमक्यांचे गांभीर्य लक्षात घेता रायगडमधील जिल्हा न्यायालयासह अन्य न्यायालयांमधील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील ठाणे, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली यांसह विविध जिल्ह्यांतील न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याचे धमकीचे ई-मेल प्राप्त झाले. या प्रकारामुळे न्यायालयीन वर्तुळासह पोलीस यंत्रणेतही मोठी खळबळ उडाली. राज्यातील न्यायालयांना लक्ष्य करण्याच्या धमक्या मिळत असल्याने रायगड पोलिसांनीही खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने सुरक्षा तपासणी सुरू केली.

सोमवारी सकाळी जिल्हा न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक नेहमीप्रमाणे कामकाजात व्यस्त असतानाच अचानक पोलिसांचा मोठा फौजफाटा न्यायालयात दाखल झाला. बॉम्बशोधक व नाशक पथक, डॉग स्कॉड, अलिबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा शाखा आणि जिल्हा विशेष शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह शंभरहून अधिक जणांच्या पथकाने न्यायालयाचा ताबा घेतला. खबरदारी म्हणून न्यायालयाचा परिसर रिकामा करण्यात आला. त्यानंतर न्यायालयीन इमारत, विविध कक्ष, प्रवेशद्वारे, पार्किंग तसेच परिसरातील प्रत्येक भागाची सखोल तपासणी करण्यात आली.

जिल्हा न्यायालयात दररोज न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे अशा धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही हलगर्जीपणा न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, न्यायालयात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील अन्य न्यायालयांमधील सुरक्षाही अधिक कडक करण्यात येणार असल्याची माहिती अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी दिली. राज्यातील न्यायालयांना धमकीचे ई-मेल पाठविण्यामागे नेमके कोण आहे, याचा शोध सायबर पोलीस घेत आहेत. या प्रकारामुळे न्यायालयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, रायगडमध्येही पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आहे.

Exit mobile version