निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांची कारवाई

714 जणांकडून शस्त्र जमा; 1615 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई

| अलिबाग | प्रमोद जाधव |

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रायगड पोलीस कामाला लागले असून, जिल्ह्यातील 1 हजार 691 परवानाधारकांपैकी आतापर्यंत 714 जणांचे शस्त्र जमा करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच, 1 हजार 516 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल असणार असून, अर्जाची छाननी 20 एप्रिल रोजी केली जाणार आहे. अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया 22 एप्रिल त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात दोन हजार 185 मतदान केंद्र आहेत. त्यात सहा संवेदनशील मतदान केंद्र आहेत. मतदान सात मे रोजी होणार असून, मतमोजणी चार जूनला होणार आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलीस कामाला लागले आहेत. जिल्ह्यात होणाऱ्या वेगवेगळ्या बैठका, सभांवर लक्ष ठेवून आहेत. गावांमध्ये होणारे उत्सव, यात्रा, जयंतीचे कार्यक्रम आनंदात व शांततेत पार पाडावे यासाठी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांमार्फत सतत आवाहन केले जात आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत होण्यासाठी पोलिसांनी प्रत्येक संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. मागील लोकसभा निवडणुकीचा आढावा घेऊन एक हजार 516 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मोहीमदेखील हाती घेतली आहे. निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरु केले आहे. तसेच निवडणुकीत काही गैरप्रकार व दुखापत होऊ नये यासाठी पोलिसांनी परवानाधारकांकडून शस्त्र जमा करण्यास सुरुवात केली आहे. रायगड पोलीस दलाच्या हद्दीत 1 हजार 691 शस्त्रधारक आहेत. त्यापैकी 714 जणांकडून शस्त्रं जमा करण्यात आली आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस दलाने गेल्या दोन महिन्यांपासून तयारी सुरु केली आहे. वेगवेगळ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे याबाबत प्रशिक्षण घेण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडण्यााठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मतदारांवर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकणारे, सराईत गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्याविरोधात कारवाईदेखील सुरु केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Exit mobile version