दहा दिवसात 27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस सज्ज झाले आहेत. निवडणुकीत दारु व अन्य अंमली पदार्थाची विक्री, वाहतूक करणार्यांविरोधात कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. दहा दिवसांमध्ये गावठी दारु, गांजा, गुटखा विक्री, वाहतूक करणार्यांविरोधात कारवाई करीत त्यांच्याकडून 27 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 15 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, कर्जत, पनवेल, उरण, महाड, श्रीवर्धन या विधानसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन यंत्रणा कामाला लागली आहे. निवडणुकीत आचारसंहितेचा भंग करणारे तसेच मतदारांना अमिष दाखविणार्यांवर अंकुश ठेवण्यासाठी रायगड पोलीस कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या कालावधीत अवैध धंद्याविरोधात रायगड पोलिसांनी धडक मोहिम हाती घेतली आहे. दारु, गांजा व गुटख्यासारख्या पदार्थांची वाहतूक, निर्मिती व विक्री करणार्यांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यात 199 ठिकाणी छापे टाकून गावठी दारु अड्डे, हातभट्यांवर छापे टाकले आहेत. 199 जणांविरोधात गुन्हे दाखल केले असून त्यांच्याकडून 21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये गावठी दारु, दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन, व साहित्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात गुटखा विक्री, वाहतूक करणार्यांवरही पोलिसांनी धाड टाकली आहे. 10 जणांविरोधात गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून पाच लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
निवडणुकीत गांजा तस्करी करणार्यांवरही पोलिसांनी लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. तीन जणांविरोधात कारवाई करून 22 हजार 600 रुपयांचा गांजा जप्त केला आहे. रायगड पोलिसांच्या या कारवाईने अवैध धंदा करणार्यांना दणका देण्यात आला आहे.
एलसीबीच्या तेरा कारवाया
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. आतापर्यंत त्यांनी तेरा ठिकाणी कारवाया करून अवैध दारू, गांजा, गुटखा विक्री वाहतूक व निर्मिती करणार्यांवर कारवाई करत त्यांना दणका दिला आहे. ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारीदेखील कंबर कसत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यात अवैध सुरु असलेल्या धंद्याविरोधात कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. गांजा, गुटखा व गावठी दारु विक्रेत्यांविरोधात कारवाई केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फतदेखील कारवाई केली जात आहे. दहा दिवसांमध्ये 27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
– सोमनाथ घार्गे,
पोलीस अधीक्षक, रायगड