। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड पोलीस दलाच्यावतीने गेले दोन दिवस सागरी कवच अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. आगामी काळात रायगड जिल्हयात होणार्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा 122 कि.मी. सागरी किनारा सुरक्षितता अधिक बळकट करण्याच्या दृष्टीकोणातून अतिरेकी कारवाई/दहशतवादी हल्ले रोखण्याकरीता सर्व सागरी विभागांची सतर्कता पडताळुन पाहण्याकरीता मंगळवारी (15 नोव्हेंबर) ते बुधवारी ( 16 नोव्हेंबर) दरम्यान सागरी कवच अभियान राबविण्यात आले.
अभियान हे भारतीय नौदल विभाग यांचे मार्फतीने राबविण्यात येत आहे. यामध्ये भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, पोलीस विभाग, भारतीय सीमा शुल्क विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मत्स्य व्यवसाय विभाग ईत्यादी आस्थापनाचा समावेश असतो.
सदर अभियानाकरीता रायगड पोलीस दलाकडून 86 अधिकारी व 507 पोलीस अंमलदार तसेच नौका विभागाकडील 8तांत्रिक अधिकारी, 19 अंमलदार व 181 सागर रक्षक दल सदस्य नेमण्यात आले होते.
रायगड पोलीस दलाने चेकपोस्ट, नाकाबंदी, लॅडींग पॉईट, महत्वाची पर्यटन स्थळे, मर्मस्थळे, फिंशीग लॅडींग पॉईट, बेटे, निर्जन ठिकाणे, मंदीरे इत्यादी ठिकाणी योग्य तो बंदेाबस्त नेमण्यात आलेला आहे. रायगड पोलीस दलाकडील 6 स्पीड बोटीद्वारे व 4 अधिग्रहीत खाजगी ट्रॉलर्सद्वारे सागरी भागात सतर्क पेट्रोलिंग करण्यात आले.यावेळी कुठेही संशयास्पद आढळले नाही.