। महाड । प्रतिनिधी ।
महाड येथील पुर व दरडग्रस्त आपत्ती व्यवस्थापनाकरीता रायगड पोलीस दलाचा स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कम्युनिटी हॉल, नवीन पोलीस वसाहत नवेनगर महाड येथे गुरुवारी (दि.7) हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. रायगड पोलीस दल महाड विभाग पुरपरिस्थिती व दरडग्रस्त परिस्थितीमध्ये आपत्ती नियोजन करण्यासारठी सज्ज झाले आहे.
आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षामध्ये पोलीस आपत्ती नियोजनाकरीता तीन पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये तीन अधिकारी आठ पोलीस अंमलदार तसेच पाच पोलीस बोटमन व पाच पोलीस अंमलदार बोट चालविण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच एक पाच टनी वाहन, दोन पीसीआर वाहन, आठ मोटार सायकल असे सर्व अत्यावश्यक साहित्यांसह सज्ज आहे. महाड उपविभागामध्ये 14 सेक्टर व पोलादपूर विभागामध्ये पाच सेक्टर तयार करण्यात आलेले आहेत. प्रत्येक सेक्टरमध्ये दिवसरात्रो अशा पद्धतीने दोन प्रशिक्षीत पोलीस अमलदार वॉकीटॉकी सह सतर्क ठेवण्यात आलेले आहेत.
पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी 5 व 6 जुलै रोजी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष महाड येथे भेट देवुन रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पाऊस व रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडुन हाय अलर्ट जरी असल्याने आपत्ती नियंत्रण कक्षातील राखीव टिम, महाड व पोलादपुर विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची एकत्रित बैठक घेवुन त्यांना पुरविण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन साहित्यासह युद्धपातळीवर आप आपले कर्तव्यावर सतर्क राहण्याबाबत सुचना दिल्या. तसेच आपत्ती व्यवस्थापनाकरीता नेमण्यात आलेल्या अधिकारी व अमलदार यांना अत्यावश्यक साधनसामुग्रीचे वाटप केले. अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड तसेच तहसिलदार सुरेश काशिद यांनी आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट देवून मार्गदर्शन केले. महाड व पोलादपुर मधील नागरिकांनी आपत्तीजन्य परीस्थितीत दुरध्वनी क्रमांक – 02145-224600 मोबाईल क्रमांक – 9730092114 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.