रायगडच्या राजकारणातील ‘माणिक’ हरपले

माणिकराव जगताप यांचे अकाली निधन
महाडमध्ये अंत्यसंस्कार,मान्यवरांकडून शोक
महाड | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष,महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे सोमवारी पहाटे मुंबई येथे उपचारांदरम्यान निधन झाले.ते 54 वर्षांचे होते.सोमवारी महाड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगी, मुलगा, जावई, भाऊ असा परिवार आहे.
काही दिवसांपूर्वी माणिकराव जगताप यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी मध्यरार्त्रीच्या सुमारास त्यांचे मुंबईत निधन झाले. महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन त्यांच्या निधनाचे वृत्त देण्यात आले आहे.
रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष,प्रदेश काँग्रसचे उपाध्यक्ष अशा विविध पदांवर ते सक्रिय होते. सन 1992 ते 1999 या काळात ते रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कार्यरत होते.तर 1999 मध्ये ते जि.प. उपाध्यक्षपदी विराजमान झालेले होते. 1999 मध्ये ते राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. 2004 मध्ये ते महाडमधून विधानसभेवर विजयी झाले.पाच वर्षे आमदार म्हणून काम करताना अनेक मुलभूत समस्यांना त्यांनी वाचा फोडली.राष्ट्रवादीत सुनील तटकरे यांच्या वाढत्या प्राबल्याला कंटाळू माणिकराव जगताप यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.कालांतराने त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारीही सोपविली गेली.नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच त्यांनी माणिकराव जगताप यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली.महाड नगरपालिकेवरही माणिकराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सत्ता हस्तगत केली आहे. तेथे माणिकरावांची कन्या स्नेहल जगताप या थेट नगराध्यक्ष म्हणून विजयी झालेल्या आहेत.
जगतापांनी राजकीय जीवनाची सुरुवात विद्यार्थी काँग्रेसमधून केली होती. त्यानंतर त्यांनी युवक काँग्रेसमध्ये अनेक पदेदेखील भूषविली होती. रायगडमध्ये प्रचंड जनमत असलेला काँग्रेसचा मोठा नेता म्हणून माणिकरावांची ओळख होती.त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील,माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील,खा. सुनील तटकरे,पालकमंत्री अदिती तटकरे आदी मान्यवरांनी शोक प्रकट केला आहे. अंत्ययात्रेच्यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे आ.भरत गोगावले, आ.अनिकेत तटकरे, जिल्ह्याधिकारी निधी चौधरी,अ‍ॅड.राजीव साबळे महाडचे तहसिलदार काशीद, डीवाएसपी निलेश तांबे आदी मान्यवर उपस्थित होते

कोकणाने तरुण नेतृत्व गमावले -आ.जयंत पाटील
महाडचे आमदार माझे मित्र माणिकराव जगताप यांच सोमवारी निधन झालं. ती बातमी कळताच खुप दुःख होतयं. कोकणातील एक तरुण नेतृत्व आणि सर्व सामान्यांचे प्रश्‍न सोडवण्याचे काम करणारा नेता आपल्यातून निघून गेलाय. त्यांना विधिमंडळात कामरण्याची संधी मिळाली. माझी पत्नी सुप्रिया पाटील यांच्याबरोबर त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये प्रभावीपणे उपाध्यक्ष म्हणून काम केलं. त्यांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांची राजकीय आक्रमकता त्यांनी कायम ठेवली. पण त्यांना त्यांच्या सहकार्‍यांनीच राजकारणात फसवलय आणि त्यामुळे हे असलेलं नेतृत्वपुढे जाण्याच्या एवजी मागे खेचण्याच काम काँग्रेस एकत्र असल्या पासून त्यांना भोगाव लागलं याचही दु:ख होत. अनेक वेळा लोकांनी त्यांना शब्द दिले पण पाळले नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा पराभव झाला. आणि एक वेगळ्या पद्धतेची खंत माझ्या मनामध्ये आहे की गेल्या विधानसभेमध्ये ते आमदार होतील अशी परिपूर्ण खात्री आणि मी त्यांना व्यक्तिगतरित्या शब्द दिला होता तो पूर्ण करु शकलो नाही ही खंत मला आयुष्यभर माझ्या मनामध्ये राहील. माणिक जगताप यांनी गोरगरिबांच काम केले आणि त्यांच्या घराण्याचीच ती परंपरा आह. कॅप्टन जगतापांपासून ती त्यांनी सुरु ठेवली. राजकीय जीवनामध्ये त्यांनी काँग्रेलचीजी साथ घेतली कॉलेजच्या राजकारणापासून ती शेवटपर्यंत त्यांनी ठेवली. एक वेगळा मित्र आणि वेगळ काम करण्याची हातोटी असणारा माझा मित्र गेला याच दुःख होतयं. वक्तृवावर त्यांचा प्रभाव होता. भाषेवर प्रभाव होता आणि त्याची उणीव रायगड जिल्ह्यामध्ये निश्‍चित भासेल विशेषतः दक्षिण रायगडमध्ये काँग्रेसच अतोनात अस नुकसान झालयं. जिल्हा काँग्रेसची त्यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये नव चैतन्य आणण्याच काम त्यांनी केले. विशेषतः तरुणांना संघटित करुन कोकणामध्ये संपूर्ण काँग्रेस पुन्हा उभी करण्याच त्यांचा जो संकल्प होता अपुरा राहीलेला आहे. महाड, पोलादपूरचा पुरोगामी विचाराचा एक नेता आज त्यांच्या निधनाने ती पोकळी कशी भरुन निघेल याची माझ्या मनामध्ये खंत आहे आणि मला वाटतं त्यांच्या सहकार्‍यांना यानिमित्तानी मी सांगू इच्छितो की, तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन तुमचा नेता तुम्ही उभा करा, निर्माण करा आणि आपला पुरोगामी विचार बहुजनांनसाठी झटण्याची जगतापांची घराण्याची जी परंपरा आहे ती पुढे चालु ठेवावी. मी शेकाप तसेच माझ्या कुटुंबाच्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.
आ.जयंत पाटील,शेकाप सरचिटणीस

हरहुन्नरी व्यक्तिमत्व हरपले
माणिक जगताप यांच्या निधनाच्या वृत्ताने खरं तर मोठा धक्काच बसला आहे. एक उमदे , हरहुन्नरी , कर्तृत्ववान नेतृत्व हरपले. माणिकराव जगताप यांच्याशी माझा परिचय 1992 साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर झाला , कै. प्रभाकर पाटील ( भाऊ) यांचं त्यांच्याशी प्रेमाचं नातं होतं . कॅप्टन जगताप माणिकराव यांचे वडील आणि पाटील कुटुंबियांचे घरगुती संबंध होते त्यांचा आणि माझा सहवास बराच काळ जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रायगडच्या राजकारणात होता, अगदी भावाप्रमाणे कदाचित त्याही पेक्षा जास्त प्रेम करणारे माणिकराव अचानक जाण्याने मला धक्काच बसला आहे . माझी आई सुलभा काकूंच्या निधनाच्या नंतर माणिकराव दोन वेळा सांत्वनपर भेटी करता येऊन गेले, अशी बातमी येईल असा विश्‍वासच बसत नाहीये ! त्यांच्या निधनाने रायगड जिल्ह्याचं आणि महाराष्ट्र काँग्रेसचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.
पंडितशेठ पाटील – माजी आमदार,

बंधुतुल्य मित्र गमावला
प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माझे निकटचे सहकारी माणिकराव जगताप यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे.त्यांच्या रुपाने काँग्रेस पक्षाचे कोकणातील एक कर्तृत्ववान नेतृत्व हरपले आहे.माणिकराव जगताप उत्तम संघटक होते,लोकांच्या प्रश्‍नांवर हिरीरीने काम करणारे नेते होते.त्यांच्या अकाली निधनाने काँग्रेसचे नुकसान झाले असन,मी एक बंधुतुल्य मित्र गमावला आहे.
अशोकराव चव्हाण,बांधकाम मंत्री

रायगड जिल्हा परिषदेची मी अध्यक्ष असताना माणिकराव जगताप हे उपाध्यक्ष होते. उपाध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले काम केले. जनतेसाठी काम करण्याची त्यांची तळमळ मी जवळून पाहिली. उत्कृष्ट वक्ता, भाषेवर प्रभुत्व असे माणिकराव आज आपल्यात नाहीत याचे दुःख जास्त होते. माझा चांगला सहकारी मी गमावला. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटूंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो ही ईश्‍वरचरणी प्रार्थना. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!
सुप्रिया जयंत पाटील, माजी अध्यक्षा, रायगड जिल्हा परिषद

Exit mobile version