| सारळ | वार्ताहर |
डाक विभागाच्या नवी मुंबई रिजन हा नवी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, मालेगाव आणि रायगड या क्षेत्रात पसरलेला आहे. यामध्ये रायगड डाक विभागाने चांगल्या कामगिरीच्या जोरावर अव्वल स्थान पटकावले आहे. या रिजनमधील मागील आर्थिक वर्षात अव्वल कामगिरी करणार्या डाक विभागाचा गुणगौरव सोहळा डीपीएस नवी मुंबई शरण्या यांच्या उपस्थितीत नेरूळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
याप्रसंगी डाक अधीक्षक सुनील थळकर यांच्या नेतृत्वात रायगड डाक विभागाने ग्रामीण भाग म्हणून मागे न राहता, मागील इतिहास बदलत अनेक क्षेत्रात परितोषिक पटकावले. यात नया साल नया जोश या अकाऊंट ओपनिंग ड्राह्यूमध्ये उपविभागामध्ये महाड डाक उपविभाग प्रथम आला, तर रायगड डाक विभागाचा द्वितीय क्रमांक आला. तसेच सर्वात जास्त बचत प्रमाणपत्र विक्रीतही प्रथम क्रमांक मिळवला, प्राप्त झालेल्या दिवशी स्पीडपोस्ट व पार्सल वितरित करणे यामध्ये 100 टक्के योगदान देत दोन्हीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला, नेट न्यू अकाऊंटमध्येही रायगड विभागाचा प्रथम क्रमांक आला. तसेच पोस्टमनद्वारे वापरले जणारे पोस्टमन मोबाइल अॅप्लिकेशन यात अलिबाग उपविभागाने बाजी मारत प्रथम क्रमांक तर, माणगाव उपविभागाने द्वितीय क्रमांक पटकवला. विविध क्षेत्रात रायगड डाक विभागाला मिळालेली नऊ पारितोषिक ही विभागातील सर्वच डाक कर्मचारीवर्गाने केलेल्या सांघिक कामगिरीचे फळ असून, प्रत्येक कर्मचारीवर्गाचा यात खारीचा वाटा आहे. विशेष म्हणजे, लोकसेवेच्या क्षेत्रात ही कामगिरी झाल्याचा आनंद अवर्णनीय असल्याची भावना यानिमित्ताने रायगड डाक अधीक्षक सुनील थळकर यांनी व्यक्त केली.