Raigad Rainfall! घरांवर कोसळली दरड; महिला जखमी

| उरण | वार्ताहर |

पावसाचा जोर वाढल्याने केगाव ग्रामपंचायत हद्दीत पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात कासवळे गावातील रहिवाशांच्या घरात पावसाबरोबर समुद्राचे खारे पाणी शिरल्याने रहिवाशांची धावपळ उडाली आहे. तर डाऊर नगर, गणेश नगर, शक्कर पीर दर्गा आणि आदिवासी वाडीवर रात्रीच्या सुमारास रहिवाशांच्या राहत्या घरावर दरड कोसळली. या घटनेत रहिवाशी महिला जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसाने रविवारपासून (दि .7) दमदार सुरुवात केली. त्यामुळे केगाव ग्रामपंचायत हद्दीत पुरपरिस्थिती निर्माण झाली. त्यातच तालुक्यातील अनेक गावांतील सखल भागात पाणी साचले होते. तर काही रस्ते पाण्याखाली गेले होते. चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीच्या नियोजनशुन्य कारभारामुळे कासवळे गावातील रहिवाशांच्या घरात तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रवि कोळी यांच्या राहत्या घरात पावसाबरोबर समुद्राचे खारे पाणी शिरल्याची घटना घडली. यावेळी रहिवाशांची एकच धावपळ उडाली. तर डाऊर नगर, गणेश नगर,शक्कर पीर दर्गा आणि आदिवासी वाडीवरील गणेश आगरकर, नवाज शेख इतर रहिवाशांच्या राहत्या घरावर रात्रीच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना घडली. या घटनेत रहिवाशी महिला जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्या असून त्या सुखरूप असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे.

चाणजे ग्रामपंचायत हद्दीत दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत असताना द्रोणागिरी डोंगर भागात चाणजे ग्रुप ग्रामपंचायत घर बांधण्याची परवानगी देत असेल तर यापुढे सदर दुर्घटनेत जीवितहानी झाली तर याची सखोल चौकशी करून घर बांधण्याची परवानगी देणाऱ्या तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.तसेच ज्या रहिवाशांच्या घराचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्तांना शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी.

सचिन डाऊर, सामाजिक कार्यकर्ते, चाणजे

पावसामुळे चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्या घटनेचे शासनस्तरावर पंचनामे सुरू केले आहेत. तरी पावसाळा सुरू असल्याने रहिवाशांनी सावधगिरी बाळगावी आणि संबंधित प्रशासनाला सहकार्य करावे.

डॉ. उध्दव कदम, तहसीलदार, उरण
Exit mobile version