स्वातंत्र्यदिनासाठी रायगड सज्ज

शासकीय कार्यालये विद्युत रोषणाईने उजळली

| अलिबाग । प्रतिनिधी ।

भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन गुरुवारी (दि. 15) जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शासकीय, खासगी संस्थांची कार्यालये विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहेत. दरम्यान, सकाळी साडेसात वाजल्यापासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

अलिबागमधील पोलीस मुख्यालयात सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांसह वेगवेगळ्या विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहे. महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे. यावेळी पोलिसांमार्फत मानवंदना दिली जाणार आहे. तसेच देशभक्तीपर कार्यक्रमदेखील यावेळी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण होणार आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत, माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक, नगरपरिषद, महानगरपालिका, नगरपंचायत अशा अनेक ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख पाहुणे दिल्लीत
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील स्वातंत्र्यदिन 2024 च्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी भारत सरकारने देशभरातील विशेष पाहुण्यांना आमंत्रित केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 123 मान्यवर व्यक्तींचा समावेश आहे. विशेष पाहुण्यांमध्ये समाजाच्या विविध स्तरांमधील व्यक्तींचा समावेश असून, यामध्ये महिला, युवा, शेतकरी, आदिवासी समाजाच्या व्यक्ती, विविध क्षेत्रांमधील अधिकारी, सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी, स्वातंत्र्यदिन प्रश्‍नमंजुषा स्पर्धेचे विजेते आणि नीती आयोगाच्या विशेष निमंत्रितांसह विविध क्षेत्रांमधील मान्यवरांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील वाशिम, संभाजीनगर व नाशिक जिल्ह्यातील व्यक्तींना खास निमंत्रण मिळाले आहे. नाशिकमधील शिक्षक विठ्ठल चौधरी, छत्रपती संभाजीनगरमधील लाडसावंगी येथील शिक्षका सारिका जैन, बुलडाणा येथील पंधरा वर्षीय पुष्कर पाटील याचाही समावेश आहे.
Exit mobile version