स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वत्र रोषणाई
| अलिबाग | प्रतिनिधी |
भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी अवघा रायगड सज्ज झाला आहे. मंगळवारी (दि.15) जिल्ह्यात सर्वत्र ‘जय हिंद’चा नारा घुमणार असून, सर्व शासकीय कार्यालये, खाजगी संस्थांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने सारा जिल्हा उजळून निघाला आहे. अलिबाग येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पोलीस परेड मैदानावर सकाळी 9 वाजता शासकीय ध्वजारोहण होणार आहे. याशिवाय सर्व शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था, सामाजिक संस्था आदी ठिकाणीही ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजनही करण्यात आलेले आहे. सर्व शासकीय कार्यालयांवर देशाची शान असलेल्या तिरंगा ध्वजातील रंगांची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने सारा परिसर उजळून निघाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी ‘जागते रहो’चा नारा दिलेला आहे. केंद्र सरकारच्यावतीनेही ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र तो फडकाविताना त्याचा अवमान होणार नाही याची योग्य ती खबरदार घेण्याचेही सुचित करण्यात आलेले आहे.