अनुज पाटील, संदेश गायकर विजयी ; चौल येथे मोठ्या उत्साहात नारळफोडी स्पर्धा संपन्न
चौल, प्रतिनिधी
मराठी संस्कृती आणि परंपरा टिकविण्यासाठी लोप पावत चाललेला कोकणातील नारळफोडीचा खेळ स्पर्धेच्या माध्यमातून सुरू ठेवण्याचे काम अलिबाग तालुक्यातील चौल कुंडेश्वर आणि शितळादेवी येथील मित्रमंडळांनी केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही याठिकाणी नारळफोडी स्पर्धा उत्साहत संपन्न झाल्या. या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन नारळ फोडले. या स्पर्धेचे वैशिष्ट्ये म्हणजे, समोरुन एक स्पर्धक नारळ फेकतो, घरंगळत आलेला नारळ दुसरा स्पर्धक फोडतो. त्यामध्ये ज्याचा नारळ शेवटपर्यंत राहतो, तो स्पर्धक विजयी होतो. कुंडेश्वर येथील स्पर्धेत अनुज पाटील याने, तर शितळादेवी येथील स्पर्धेत संदेश गायकर याने सर्वाधिक नारळ फोडत प्रथम क्रमांक पटकाविला.
चौल येथील ओम साई कुंडेश्वर मित्रमंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे शनिवार, दि. 12 ऑगस्ट रोजी नारळफोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन मराठी अभिनेत्री मानसी नाईक यांचे पती दृवेश कपुरिया यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री मानसी नाईक, दृवेश कपुरिया, अमित फुंडे, सुधीर पाटील, प्रभाकर मळेकर, प्रवीण ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत 16 संघांनी सहभाग घेतला होता. संघातील प्रत्येक स्पर्धक पाच-पाच नारळ घेऊन स्पर्धेत सहभागी झाला होता. ज्याने जास्त नारळ फोडले, त्याला विजयी घोषित करण्यात आले. अनुज पाटील याने सर्वाधिक नारळ फोडीत प्रथम क्रमांकाच्या चषकावर नाव कोरले. तर, द्वितीय क्रमांक प्रसाद पाटील, तृतीय आर्वी घरत, चतुर्थ दिपक ठाकूर यांनी पटकाविला. उत्कृष्ट मारेकरी म्हणून हितेश कदम याला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सिद्धेश मळेकर, दिपक ठाकूर, सतीश पाटील, अभिजित घरत, हितेश कदम, दिपेश पाटील, प्रणेश म्हात्रे, साईश राऊत यांनी मेहनत घेतली.
शितळादेवी येथे कै. नथुराम महादेव गुरव यांच्या स्मरणार्थ शितळादेवी मित्रमंडळाकडून रविवार, दि. 13 ऑगस्ट रोजी नारळफोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 24 संघांनी सहभाग नोंदविला होता. संघातील प्रत्येक स्पर्धक सहा-सहा नारळ घेऊन स्पर्धेत उतरला होता. या स्पर्धेेचे उद्घाटन सुरेश मळेकर यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, चौल ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजित गुरव, सचिन राऊळ, राजेंद्र गुरुव, विश्वनाथ मळेकर, कल्याणी बाजी, नारायण घरत, अजित मिसाळ, नंदकुमार नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी फ्रीज, एलईडी टिव्ही, कुलर अशी पारितोषिके ठेवण्यात आली होती. स्पर्धेत संदेश गायकर याने प्रथक क्रमांक पटकाविला. त्याला फ्रीज व चषक देऊन गौरविण्यात आले. तर, अनंत फुटाणकर, निखिल वारगे यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केदार मळेकर, प्रसाद नाईक, मंदार वर्तक, प्रथमेश गुरव, दिपेश गुरव, प्रतिक गुरव व शितळादेवी मित्रमंडळाच्या सर्व सभासद, ग्रामस्थांनी मेहनत घेतली.
या दोन्ही स्पर्धेत एक हजारपेक्षा जास्त नारळ फोडण्यात आले. या स्पर्धेमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीसुद्धा आवर्जून सहभाग घेतला होता. ज्येष्ठ नागरिक यांनीदेखील या स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. दरवर्षी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त नारळ फोडण्यात आले होते. पुढच्या वर्षीही यात आणखी वाढ होईल, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
नारळाला हजारांचा भाव
सर्वसाधारणपणे रोजच्या जेवणात वापरण्यात येणाऱ्या नारळाचा भाव 20 ते 25 रुपयांच्या घरात असतो. परंतु, स्पर्धेसाठी वापरण्यात येणारे नारळाचा दर ऐकताच तोंडात बोट घालण्याची वेळ येते. कारण, एका-एका नारळासाठी हौशी स्पर्धक एक ते दोन हजार रुपये मोजतो. खेळीच्या नारळाची करवंटी रोजच्या वापरातील नारळांपेक्षा कैकपटीने जाड असते. असे नारळ शोधून-शोधून स्पर्धेसाठी वापरले जातात.
अशी होते स्पर्धा
अलिबाग तालुक्यात चौल, रेवदंडा, नागाव आदी ठिकाणी नारळफोडीच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात. मागील काही वर्षांपासून या स्पर्धेच्या माध्यमातून विजेत्यांना मोठ मोठी बक्षित देण्यात येत असल्याने, सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची संख्यादेखील दरवर्षी वाढत आहे. काही ठिकाणी हातावर नारळ पकडून त्याला दुसऱ्या स्पर्धकाने फोडणे अशी स्पर्धा होते. तर, चौल परिसरात एका स्पर्धकाने आपल्या हातातील नारळ समोर आठ ते दहा फुटांवर उभ्या असलेल्या विरोधी स्पर्धकाकडे घरंगळत सोडायचा असतो. त्याला समोरील स्पर्धक आपल्या हाताील नारळाने अचूक मारुन तो नारळ फोडतो. दोन्ही प्रकारच्या स्पर्धेत जो स्पर्धक नारळ फोडतो, त्याच्या खात्यात तो नारळ बक्षीस म्हणून जमा होतो.