संपूर्ण देशात अलिबाग डाक कार्यालय दुसऱ्या क्रमांकावर
रायगड खास प्रतिनिधी
हर घर तिरंगा हे अभियान रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. 76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध सरकारी कार्यालयांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अलिबाग येथील डाक विभागाची इमारतदेखील तिरंग्याच्या रंगात न्हावून निघाली आहे. यातील अभिमानाची बाब म्हणजे, संपूर्ण देशातील डाक कार्यालयांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर अलिबाग डाक कार्यालयाच्या इमारतीचा फोटो झळकत आहे.
अलिबाग एसटी आगारामध्ये हर घर तिरंगा अभियानांतर्गत खास जनजागृती मोहीम राबवत तिरंगा जनतेसाठी उपलब्ध करून दिला आहे. घरोघरी जनसंपर्क असणाऱ्या पोस्टमनवर्गामार्फत तिरंग्याचे वितरणही केले जात आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आगार व्यवस्थापक अलिबाग यांनी केले. अलिबाग डाक कार्यालयाच्या कर्मचारीवर्गाने या मोहिमेच्या जनजागृतीसाठी तिरंग्यासोबत घोषणा देत रॅलीही काढली. या कार्यक्रमचा चांगला प्रतिसाद लाभला.
15 ऑगस्टनिमित्त अलिबाग पोस्ट ऑफिसच्या इमारतीला तिरंग्याच्या रंगात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यासाठी संजय राणे यांनी विशेष मेहनत घेतली आहे. काळोख झाल्यानंतर तिरंग्याच्या रंगात दिसणाऱ्या इमारतीचा फोटो घेण्याचा मोह या रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांना होत आहे. आपण जसे दिवाळी, दसरा, ईद, नाताळ हे धार्मिक उत्सव जोशात साजरे करतो, तसेच 15 ऑगस्ट हा देशाचा सण म्हणून साजरा व्हावा हा उद्देश या जनजागृतीमागे असल्याची भावना डाकघर अधीक्षक सुनील थळकर यांनी व्यक्त केली. या अभियानासाठी सहायक अधीक्षक सुनील पवार, गजेंद्र भुसाणे पोस्ट मास्टर अलिबाग यांनी विशेष लक्ष दिले आहे.