| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई, पालघरमधील चाकरमानी कोकणात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. हजारो चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा, यासाठी मुंबई, पालघरच्या एसटी महामंडळाने रायगड विभागाची मदत घेतली आहे. मुंबई, पालघर येथून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शुक्रवार ते शनिवारी या तीन दिवसात 178 एसटी बसेस रायगडमधून पाठविल्या जाणार आहेत.
कोकणातील असंख्य मंडळी मुंबई, पालघरमध्ये नोकरी, व्यवसायानिमित्त राहत आहेत.गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात रत्नागिरी, सिंधुदूर्गमध्ये जाण्याची लगबग या चाकरमान्यांची सुरु झाली आहे.गणेशोत्सवासाठी दीड, पाच, सात, दहा दिवस सुट्टी काढून चाकरमानी त्यांच्या गावी दाखल होणार आहेत. चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ सज्ज झाली आहे. मुंबई व पालघरमधील चाकरमान्यांना कोकणात घेऊन जाण्यासाठी एसटी महामंडळाने रायगड विभागाची मदत घेतली आहे. रायगड जिल्ह्यातून 174 एसटी बसेस मुंबई, पालघरमधून कोकणात जाणार आहेत. शुक्रवारी (दि. 11) 52, शनिवारी (दि.12) 74 आणि रविवारी (दि.13) 52 एसटी बसेस कोकणात पाठविल्या जाणार आहेत. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. रायगड विभागाकडून नियोजन करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तसेच महाड तालुक्यातील गावांमधील भक्तांना मुंबई, ठाणे, कल्याण, बोरीवली, पुणे, विद्याविहार, नालासोपारा येथून आणण्यासाठी ग्रुप बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तब्बल 74 एसटी बसेस यासाठी बुक करण्यात आल्या आहेत. या भागातील गणेशभक्त महाड तालुक्यामधील अनेक गावांमध्ये थेट एसटीतून पोहोचणार आहेत. तसेच अलिबाग तालुक्यातही नोकरी व्यवसायानिमित्त चाकरमानी आहेत. या चाकरमान्यांना गणेशोत्सवामध्ये थेट अलिबागहून माणगाव, महाड, चिपळूण, खेड, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर, सावंतवाडी अशा अनेक भागांमध्ये जाण्यासाठी अलिबाग एसटी बस आगारातून अलिबाग-सावंतवाडी ज्यादा एसटी बस सुरु करण्यात येणार आहे. अकरा व बारा सप्टेंबर अशी दोन दिवस ही सेवा सुरु राहणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली.
चाकरमान्यांच्या मदतीसाठी रायगडची एसटी
