डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी रायगडचा संघ रवाना

| खारेपाट | प्रतिनिधी |

डायरेक्ट व्हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशन महाराष्ट्र राज्य आयोजित पुरुष, महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा 2022 करिता रायगड जिल्ह्याचा संघ पारनेर, जि. अहमदनगर येथे सोमवारी रवाना झाला. ही स्पर्धा दि. 3 व 4 डिसेंबर रोजी अशी दोन दिवस पार पडणार आहे.

या संघाची धुरा कर्णधार रत्नेश मोकल व उपकर्णधार विक्रम पाटील यांच्या खांद्यावर असून अविनाश कोकीलकर, यश शिंदे, मिथून घाडगे, विनोद डुंगरे, भावेश दिघे, रोहित पाटील, सुभाष पाटील, बन्सीधर चौधरी, अजित पाटील यांचा संघात समावेश आहे. संघाचे कोच रेवन पाटील, संघव्यवस्थापक सुनील म्हात्रे आहेत. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतून संघ सहभागी होणार आहेत. रायगड संघाचा सराव नुकताच प्रायव्हेट हायस्कूल पेण येथील मैदानात करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून समीर म्हात्रे माजी नगरसेवक पेण व डायरेक्ट व्हॉलीबॉल प्रमोशनचे अध्यक्ष तसेच राज्याचे सचिव शरद कदम, रवींद्र म्हात्रे, हिरामन भोईर, रमेश म्हात्रे, अजित जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा पारनेर क्रीडा संकुलात होतील. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष आ. निलेश लंके, तसेच डायरेक्ट व्हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनचे महाराष्ट्राचे सचिव शरद कदम व सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होईल. सर्व सामने अखिल भारतीय डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनच्या नवीन नियमानुसार खेळविले जातील. डायरेक्ट व्हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशन महाराष्ट्र राज्याला संलग्न असणार्‍या संघांनाच या सामन्यात भाग घेता येईल. नवीन संघ संलग्न करुन प्रवेश देण्यात येईल. एका संस्थेच्या एकाच संघाला प्रवेश दिला जाईल. सर्व खेळाडूंनी नियमांचे पालन करावे, अशी माहिती माहाराष्ट्राचे सचिव शरद कदम यांनी दिली.

Exit mobile version