राज्य अजिंक्यपद, निवड चाचणी 2024
। धाराशिव । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर सुवर्ण महोत्सवी कुमार व कुमारी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा पार पडत आहे. या स्पर्धेतील कुमारी गटात नंदुरबारने छत्रपती संभाजीनगरचा 6-1 असा पाच गुणांनी पराभव केला. तसेच, रोहिणी गावित हिने सलामीचा दिवस गाजविला. तिने पहिल्या डावात 8ः40 मिनिटे व दुसर्या डावात नाबाद 9ः00 मिनिटे संरक्षण केले आहे.
कुमारी गटाच्या दुसर्या सामन्यात रायगडने लातूरला 16-14 असे 2 गुणांनी नमविले आहे. यावेळी मध्यंतराची 6-5 ही एका गुणाची आघाडीच रायगडला विजय मिळवून देऊन गेली आहे. यावेळी संजीवनी जगदाळे हिने 2ः00 मिनिटे नाबाद पळती करीत आक्रमणात सहा गडी बाद केले. तसेच, लातूरच्या पायल माने हिची लढत अपुरी पडली. तिने आपल्या धारदार आक्रमणात सात गडी बाद करीत 1ः10 मिनिटे संरक्षण केले. यानंतरचे सर्व सामने एकतर्फी झाले आहेत.
कुमार गटात धुळ्याने छत्रपती संभाजीनगरला 21-18 असे तीन गुणांनी नमविले आहे. मध्यंतराची 11-9 ही 3 गुणांची आघाडीनेच त्यांना विजय मिळवून दिला आहे. त्यांच्या कुणाल शेटे याने दोन व एक मिनिटे नाबाद पळती करत दोन गडी बाद केले. अभिषेक गावित याने 1ः50 व 1ः20 मिनिटे संरक्षण करीत तीन गडी बाद केले. दुसर्या सामन्यात रायगडने सिंधुदुर्ग 17-13 अशी चार गुणांनी मात केली आहे. भावेश गोवलीकर रायगडच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. त्याने या सामन्यात पाच गडी बाद करीत 1ः00 व 1ः20 मिनिटे यशस्वी पळती केली आहे. सिंधुदुर्गच्या अथर्व शिंदे याची खेळी अपुरी पडली.
उप उपांत्यपूर्व फेरीत होणारे सामने
कुमार : सोलापूर वि. बीड, धुळे वि. अहमदनगर, नाशिक वि. रत्नागिरी, रायगड वि. सांगली, धाराशिव वि. सातारा, नंदुरबार वि. मुंबई, ठाणे वि. मुंबई उपनगर, जालना वि. पुणे.
कुमारी : धाराशिव वि. नंदुरबार, अहमदनगर वि. रत्नागिरी, मुंबई उपनगर वि. पालघर, धुळे वि. ठाणे, सांगली वि. जालना, रायगड वि. पुणे, सोलापूर वि. मुंबई, सातारा वि. नाशिक.