विद्यार्थ्यांनी साजरा केला वृक्षांचा वाढदिवस
। पाली-बेणसे । वार्ताहर ।
जिल्हा परिषद शाळा नेणवली येथे सोमवारी (दि.1) कृषिदिनाचे औचित्य साधून गटशिक्षणाधिकारी बांगारे व केंद्रप्रमुख कल्पना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वृक्षारोपणसाठी स्वरदिव्य वेलफेअर फॉउंडेशन रायगड व ग्रीनटच नर्सरीच्या मार्फत शेवगा, कडुलिंब, कांचन, कढीपत्ता, चाफा, सोनचाफा, आवळा, बेल अशी उपयुक्त रोपे उपलब्ध करून देण्यात आली होती.
यावेळी सर्वप्रथम वृक्षारोपण प्रतिज्ञा घेण्यात आली. तद्नंतर वृक्षदिंडी काढून झाडे आणण्यात आली. तसेच, यावेळी झाडे लावा, झाडे जगवा अशा घोषणा मुलांनी दिल्या. शाळेतील मुलांनी सुद्धा एक विद्यार्थी एक झाड उपक्रमांतर्गत काही झाडे आणली होती. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोहर कोंडे, सर्व सदस्य, मुख्याध्यापक राजेंद्र अंबीके, रवींद्र हंबीर, गणपत वरगडे व सर्व विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात रोप लागवड केली.
नेणवली शाळेतील विद्यार्थी कृषिदिनाचे औचित्य साधून दरवर्षी वृक्ष वाढदिवस आवडीने साजरा करीत असतात. यावेळी विद्यार्थ्यांनी यापूर्वी लावलेल्या वृक्षांचे औक्षण करून झाडाला फेर धरून वाढदिवस गीत गात चॉकलेट वाटून अनोखा वाढदिवस साजरा करून पर्यावरण व वृक्षप्रति आपल्या भावना जोपासल्या. तसेच, मुख्याध्यापक राजेंद्र अंबिके यांनी आजच्या दिनाचे महत्व व वृक्षनिगा, जोपासना याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.
आज आम्ही वृक्ष तर लावलेच पण त्यांचा वाढदिवस साजरा करताना खूप मज्जा आली. आम्ही चॉकलेट व केकसुद्धा वाटले.
श्रेया मगर, विद्यार्थीनी, नेणवली
रिमझिम पावसात मुलांच्यासोबत वृक्षारोपण कार्यक्रम व पर्यावरण संवर्धनाचा वसा खूपच आल्हाददायक वाटला.
राजेंद्र अंबिके, मुख्याध्यापक