नववर्षाच्या स्वागत यात्रांनी रायगड दुमदुमला

नववर्षाच्या स्वागतासाठी रायगडातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये, गावामध्ये सार्वजनिक स्वरुपात भव्यदिव्य शोभा यात्रा काढून नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. पारंपारिक पोषाख परिधान करुन हजारो नागरिक स्वयंस्फूर्तीने या शोभायात्रांमध्ये सहभागी झालेले होते. शहरात ठिकठिकाणी, घरोघरी उंच गुढ्या उभारुन नव वर्षाचे स्वागत करण्यात आले. तसेच अनेक ठिकाणी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच सुरु झालेल्या या शोभा यात्रांमध्ये पारंपारिक वेशभूषा, चित्ररथ, सामाजिक संदेश, युद्ध कला दर्शवणार्‍या कसरती यांची ओळख करुन देणार्‍या चित्र रथाची आणि कार्यक्रमाची मोठी रेलचेल असल्याचे पाहायला मिळाली.

रायगडमध्ये शोभा यात्रेची पारंपारिक धुम

हिंदू नववर्षानिमित्त रायगड जिल्ह्यात वेगवेगळ्या संस्था, संघटनाच्या वतीने अलिबागसह संपुर्ण जिल्ह्यात शोभायात्रा काढण्यात आली. मराठमोळा पारंपारिक पेहराव करीत तरुणाई यात्रेमध्ये सहभाग नोंदवला होता. एक वेगळा उत्साह तरुणाईमध्ये दिसून आला होता.


ग्रामीण व शहरी भागात घरोघरी गुढी उभारण्यात आली. त्यानंतर विधीवत पूजा करण्यात आली. हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा अनेकांनी देत हा सण जल्लोषात साजरा केला. गुढीपाडव्याचे औचित्य साधत मंगळवारी (दि.9) जिल्ह्यात 21 ठिकाणी शोभा यात्रा काढण्यात आल्या. अलिबागमधील ब्राह्मणआळी येथील राम मंदिर येथून शोभायात्रेला सकाळी सुरुवात झाली. या शोभायात्रेसोबत वेगवेगळे ऐतिहासिक क्षणचित्रे, ढोल ताशांचा गजर, लेझीम, लाठीकाठीचे प्रदर्शन भरविण्यात आले. एक वेगळा उत्साह प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसून येत होता. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शोभा यात्रेची सांगता झाली. शहरी भागासह ग्रामीण भागातील अनेक तरुणांनी सकाळी एकत्र येत नववर्षाचे स्वागत जल्लोषात केले. काहींनी दुचाकीवर प्रभात फेरी काढली. या प्रभात फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


नेरळ येथे नववर्षाचे स्वागत
नेरळ येथे नववर्षे स्वागतानिमित्ताने मिरवणूक काढण्यात आली. नववर्षे स्वागत यात्रा समितीच्या वतीने गेली 15 वर्षे मिरवणुक काढण्यात येत असून यावर्षी देखील जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.


मंगळवारी (दि. 9) नेरळ येथील चिंच आळीमध्ये असलेल्या श्री गुरुदत्त मंदिर येथून स्वागत यात्रेला सुरुवात झाली. या स्वागत यात्रेत असंख्य महिलांनी शोभायात्रेत भाग घेतला. सोबतीला ढोलकी, बाजा, स्थानिक वारकर्‍यांचे अभंगवाणी सादर करणारे भजनी मंडळ देखील होते. महिलांनी मोठे रिंगण घेऊन लेझीमच्या तालावर ठेका घेतला होता. या शोभायात्रेची जुनी बाजारपेठमधील श्रीराम मंदिरात आरतीने यात्रेची सांगता झाली.

पनवेलमध्ये लाखोंची उलाढाल

हिंदू नववर्षाची सुरूवात म्हणून साजर्‍या करण्यात येणार्‍या गुढीपाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. 9) पनवेल मधील विविध वसाहतीत मोठ्या प्रमाणात शोभा यात्रा काढण्यात आल्या होत्या. या यात्रांमध्ये सहभागी नागरिकांमध्ये यावेळी मोठा उत्साह पाहायला मिळाला असून, तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांमार्फत या कार्यक्रमात नागरिकांनी आणि राजकीय पुढर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

3 / 7

हिंदू नवं वर्ष म्हणून साजर्‍या होणार्‍या गुढीपाडव्यानिमित्त पनवेल परिसरात घरोघरी गुढी उभारण्यात आली होती.त्याचबरोबर तालुक्यातील पनवेल शहर, कळंबोली वसाहत, खारघर तसेच इतर वसाहती काढण्यात आलेल्या शोभा यात्रांमध्ये मराठी संस्कृती दिमाखात मिरवण्यासाठी शोभायात्रा देखील काढण्यात आली होती.

Exit mobile version