पारंपारिक पोषाता नागरिक सहभागी
। पनवेल । वार्ताहर ।
दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर पनवेल शहरासह नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठा, खारघर, करंजाडे आदी परिसरात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पनवेल शहरात नववर्ष स्वागत समिती पनवेलच्यावतीने गुढीपाडव्यानिमित्त शहरात शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. तसेच नवीन पनवेल येथे नगरसेवक अॅड.मनोज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य शोभा यात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक पारंपारिक वेशात सहभागी झाले होते. या निमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ढोल ताशांच्या गजरात लेझिम पथक, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आदींच्या द्वारे तसेच जनजागृती फलक हाती घेवून आबालवृद्ध यात सहभागी झाले होते. या शोभा यात्रेचे विविध ठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. तर अनेकांनी सरबत, आईस्क्रिम तसेच खाऊ, पेढ्यांचे वाटप केले. या शोभा यात्रेच्या निमित्ताने विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. त्याचा बक्षिस समारंभ पार पडला. अत्यंत उत्साहाच्या वातावरणात या शोभा यात्रा पार पडल्या. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.