ग्रामीण भागात 11 दिवसात 2 लाख 87 हजार वृक्ष लागवड; रायगड जिल्हा परिषदेचा उपक्रम
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 1 ते 31 जुलै कालावधीत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, 6 लाख 44 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे. त्यानुसार 1 जुलै ते 11 जुलै या 11 दिवसात जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध प्रजातींच्या 2 लाख 87 हजार 67 वृक्षांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाने आगामी काळात हिरव्यागार वनश्रीने रायगड बहरुन जाईल,असा दावा प्रशासनाने केला आहे.
वृक्षलागवड मोहीम ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालये, आरोग्य केंद्र व उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळे, समुद्र किनार्यावर खुल्या जागेत, दरड प्रवण क्षेत्रातील डोंगर पायथ्याच्या महत्वाच्या ठिकाणी, पुरक्षेत्रातील गावामधील नदी किनार्यालगतच्या ठिकाणी प्रामुख्याने राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ 1 जुलै रोजी अलिबागमध्ये कुंठे बाग व वरसोली समुद्रकिनारी वृक्ष लागवड करून करण्यात आला होता. या मोहिमेंतर्गत जिल्हाभरात भारतीय प्रजातींची विविध झाडे लावण्यात येत असून, बांबूची बेटे निर्माण करण्याचे विशेष नियोजन करण्यात आले आहे.
उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना
जिल्ह्यात महिनाभरात 6 लाख 44 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट तालुकास्तरावर देण्यात आले होते. त्यामधील 11 जुलैपर्यंत 2 लाख 87 हजार 67 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायतींनी त्यांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही त्यांनी वेळेत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
वृक्ष लागवड कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकास्तर, ग्रामपंचायत स्तरावर स्वयंसेवी संस्था, स्वदेश फाऊंडेशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवक, स्वयंसहाय्यता बचत गटातील महिला, गावातील महिला मंडळे, भजनी मंडळे व युवक यांचा लोकसहभाग घेण्यात येत आहे.
डॉ.किरण पाटील, सीईओ, जिल्हा परिषद, रायगड
तालुका : वृक्ष लागवड उद्दिष्ट : वृक्ष लागवड
अलिबाग : 49 हजार 600 : 58 हजार 600
खालापूर : 35 हजार 200 : 24 हजार 180
कर्जत : 43 हजार 200 : 23 हजार 79
महाड : 1 लाख 7 हजार 200 : 4 हजार 800
माणगाव : 57 हजार 600 : 32 हजार 186
म्हसळा : 31 हजार 200 : 1 हजार 402
पनवेल : 55 हजार 200 : 24 हजार 560
श्रीवर्धन : 34 हजार 400 : 22 हजार 900
पोलादपूर : 33 हजार 600 : 4 हजार 807
मुरुड : 19 हजार 200 : 15 हजार 750
पेण : 52 हजार : 14 हजार 920
रोहा : 51 हजार 200 : 11 हजार 498
तळा : 20 हजार : 10 हजार 145
सुधागड : 26 हजार 400 : 26 हजार 400
उरण : 23 हजार : 11 हजार 840
एकूण : 6 लाख 44 हजार : 2 लाख 87 हजार 67