कर्जत तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींचा रायगड जिल्हा परिषदेकडून सन्मान

। नेरळ । प्रतिनिधी ।
केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या मिशनमध्ये सातत्यपूर्ण सहभाग आणि ते मिशन पूर्ण करण्यासाठी केलेली अंमलबजावणीसाठी रायगड जिल्हा परिषदेने कर्जत तालुका मधील दहा ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी कर्जत तालुका पंचायत समितीच्या आढाव बैठकीत या सर्व ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक-ग्रामविकास अधिकारी यांचा सन्मान केला. कर्जत तालुक्यात 53 ग्रामपंचायती असून त्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये शासनाच्या जल जीवन मिशन, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना यात कामे केली आहेत. त्यात अग्रेसर असलेल्या ग्रामपंचायतींना कर्जत तालुका आढावा बैठकीत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी सन्मानित केले. त्यात सरपंच आणि ग्रामसेवक-ग्रामविकास अधिकारी यांनी हे सन्मान स्वीकारले. त्यावेळी कर्जत पंचायत समितीच्या सभापती सुषमा ठाकरे, गटविकास अधिकारी साबळे, अतिरिक्त गटविकास अधिकारी सी.एस.राजपूत, गटशिक्षण अधिकारी सुषमा हिरवे आदी उपस्थित होते.

Exit mobile version