| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ ते कशेळे बस सेवा बंद केल्याने विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा पायपीट सुरू करावी लागत आहे. तसेच, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शाळेचे नुकसान होत असून, कर्जत एसटी आगार प्रमुख यांच्यावर राजकीय दबाव असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, कर्जत एसटी आगाराने नेरळ कशेळे मार्गावर सुरू केलेली सर्व फेऱ्या कायम ठेवाव्यात अन्यथा रस्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा किसान क्रांती संघटना आणि आरपीआय आठवले गटाने दिला आहे.
नेरळ वाकस मार्गे कशेळे बस सेवा विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे होणारी गैरसोय दूर होण्यासाठी तीन ऑगस्टपासून सेवा चालू करण्यात आली होती. त्यानंतर या मार्गावर राहणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी बस सेवेसाठी पास काढण्यात आले. विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी होणारी पायपीट कमी व्हावी यासाठी बस सेवा सुरू करण्यात आली होती. तसेच, काही दिवसांपूर्वी प्रवाशांसाठीही अतिरिक्त फेऱ्या चालू केले होत्या. परंतु, त्या प्रवासी फेऱ्या बंद करून फक्त विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू ठेवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा शुक्रवार दि.11 सप्टेंबर सर्वच फेऱ्या बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे. त्यामुळे पाच किलोमीटर अंतरापासून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बस सेवा बंद झाल्याने मुलांची शाळेत जाण्याची गैरसोय होत आहे. तसेच, शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना काही रिक्षा व इको चालक घेत नसल्याची तक्रार देखील केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थी प्रवाशाचा साधन बंद झाल्याने मुलांना घरी परतावे लागत आहे. या मुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. दरम्यान, या मार्गावर अचानक एसटी गाड्या बंद केल्याने कर्जत एसटी आगार प्रमुखांवर स्थानिक रिक्षा चालकांच्या माध्यमातून राजकीय दबाव टाकला जात असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे किसान क्रांती संघटना आणि आरपीआय संतप्त झाले असून, भविष्यात रस्ता रोको आंदोलन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






