जिल्हाभरातील 17 शिक्षकांची निवड
| रायगड | प्रतिनिधी |
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात येणारे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 2025/26 या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हाभरातील 17 शिक्षकांची निवड आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी करण्यात आली असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व प्राथमिक शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांनी दिली आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा 5 सप्टेंबर हा जन्म दिवस दरवर्षी शिक्षक दीन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हा परिषदेकडून प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
यावेळी 2025/26 या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्याभरातील मनोहर पाटील (अलिबाग), किशोर पाटील (पेण), योगिनी वैदू (पनवेल), संज्योती कांबरी (कर्जत), किर्ती धारणे (खालापूर), अजित जोशी (उरण), वृषाली गुरव (सुधागड), प्रसाद साळवी (रोहा), वसंत साळुंखे (महाड), सीमा चव्हाण व नारायण खोपटकर (श्रीवर्धन), शशीकांत भिंगारदेवे (म्हसळा), विजय पवार (पोलादपूर), सुजाता मालोरे व परेश अंधेर (माणगाव), उल्का मोडकर (तळा) आणि हेमकांत गोयजी (मुरुड) यांना जिल्हा आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
अजित जोशी
उरण तालुक्यातील पिरकोनचे शिक्षक अजित जोशी यांना रायगड जिल्हा परिषदे तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणार असल्याचे जाहीर झाले आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकांचा, शुभेच्छांचा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.
मनोहर पाटील
अलिबाग तालुक्यातील सुडकोळी राजिप शाळेचे शिक्षक व दिवी पारंगी गावाचे रहिवाशी मनोहर महादेव पाटील यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सुधागड तालुक्यातील प्राथमिक विभागातून नवघर शाळेच्या वृषाली प्रशांत गुरव या शिक्षिकेची निवड रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी करण्यात आली. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला असून त्यांच्यावर सर्वत्र स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.
कर्जत तालुक्यातील माणिवली येथील जिल्हा परिषद शाळेच्या उप शिक्षिका संज्योती कांबरी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. रायगड जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून 18 वर्षे सेवा बजावली असून त्यांचे शिक्षण एमएबीएडपर्यंत झाले आहे. त्यांनी सुरुवातीला खालापूर तालुका नंतर कर्जत तालुका नंतर रोहा तालुक्यात आणि आता उप शिक्षिका म्हणून सेवा बजावल्यावर गेल्या काही वर्षापासून कर्जत तालुक्यातील माणिवली येथे सेवेत आहेत. तसेच, शैक्षणिक कार्यासह सामाजीक कार्यातही त्यांचा विशेष योगदान राहिले आहे.
पेण तालुक्यातील सोनखार येथील राजीप शाळेचे प्राथमिक शिक्षक किशोर लक्ष्मण पाटील यांना रायगड जिल्हा परिषद शिक्षण खात्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. मूळचे शिर्कीचाळ येथील रहिवासी असणारे किशोर पाटील यांचे शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य क्रीडा क्षेत्रातील कार्य व संघटनात्मक कार्य कौतुकास्पद असून इतरांसाठी प्रेरणादायी आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे विविध शिक्षक संघटना तसेच शिर्की पंचक्रोशी तसेच शिक्षक वर्गाकडूनअभिनंदन केले जात आहे.







