माझी वसुंधरा अभियानांतर्गत रायगड जि.प.च उद्या सन्मान

राज्य सरकारकडून कौतुकाची थाप
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानात रायगड जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी रायगड जिल्ह्याने केलेल्या कामगिरीबाबत राज्य सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांच्यावतीने रायगड जिल्हा परिषदेचा सन्मान रविवारी (दि.5) मुंबई येथे करण्यात येणार आहे.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असणार आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील हा सन्मान स्वीकारतील. पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील नागरी व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये व ग्रामपंचायतीमध्ये राबविणेत येत आहे. या अभियानात रायगड जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील 530 ग्रामपंचायतींनी या अभियानात नोंदणी करून सहभाग नोंदविला होता. या अभियानांतर्गंत पंचतत्त्वाशी संबंधित घटकांवर काम केले जाईल. त्यामध्ये पृथ्वी घटकासाठी वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, जमिनीचे धुपीकरण थांबवणे, या मुद्द्याशी संबंधित कामे केली जात आहेत. तर वायूतत्त्वासाठी प्रदुषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, जल तत्त्वाशी संबंधित कामांमध्ये नदी संवर्धन, सागरी जैवविविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनार्‍याची स्वच्छता करणे, अग्नी तत्त्वानुसार उर्जेचा परिणामकारक वापर करणे, उर्जा बचत, अपव्यय टाळणे, अपारंपरिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतील. आकाश तत्त्वातील स्थळ व प्रकाशाने मानवी स्वभावात होणार्‍या बदलांसाठी जनजागृती करणे, यावर भर दिला जात आहे.


माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचा सन्मान सोहळा रविवारी, सकाळी 10.30 वाजता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टाटा थिएटर, एन.सी.पी.ए., नरीमन पाईट येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version