रायगडातील 530 ग्रामपंचायतींचा निर्धार
जि.प.तर्फे सरपंच, ग्रामसेवकांची कार्यशाळा
। अलिबाग । भारत रांजणकर ।
मी अशी शपथ घेतो की निसर्गाशी संबधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांशी निगडीत जीवन प्रणाली अंगीकारून माझी वसुंधरा-स्वच्छ वसुंधरा या संकल्पाला पूर्ण करीन. मी हरित अच्छादनासाठी वृक्ष लागवड, वृक्षाचे संवर्धन व निगराणी करण्यास कटीबद्ध राहीन,अशी शपथ घेत रायगडातील 530 ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी माझी वसुंधरा हे अभियान 100 टक्के यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
राज्यातील स्स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातही या अभियानाला प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असून, या अभियानात जिल्ह्यातील 530 ग्रामपंचायतींनी नोंदणी करून सहभाग नोंदविला आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाना 31 मार्च अखेरपर्यंत केलेल्या कामांची माहिती दुसर्या टप्प्यातील चखड मध्ये 1 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत भरावयाची आहे. यासाठी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांची कार्यशाळा जिल्हा परिषदेत पार पडली.यावेळी प्रशासनाच्यावतीने या सर्वांना ही शपथ देण्यात आली.त्यांच्या सामूहिक शपथग्रहणाने जि.प.चे ना.ना.पाटील सभागृहही भारावून गेले.
सदर कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय नोडल अधिकारी विराट राजपूत व अरुंधती कामत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर, पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड उपस्थित होते.
करण्यात येत असलेली कामे
अभियानांतर्गंत पंचतत्त्वाशी संबंधित घटकांवर काम केले जाईल. त्यामध्ये पृथ्वी घटकासाठी वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, जमिनीचे धुपीकरण थांबवणे, या मुद्द्याशी संबंधित कामे केली जात आहेत. तर वायूतत्त्वासाठी प्रदुषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, जल तत्त्वाशी संबंधित कामांमध्ये नदी संवर्धन, सागरी जैवविविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनार्याची स्वच्छता करणे, अग्नी तत्त्वानुसार उर्जेचा परिणामकारक वापर करणे, उर्जा बचत, अपव्यय टाळणे, अपारंपरिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतील. आकाश तत्त्वातील स्थळ व प्रकाशाने मानवी स्वभावात होणार्या बदलांसाठी जनजागृती करणे, यावर भर दिला जात आहे.
रायगड जिल्ह्यात माझी वसुंधरा अभियानात उत्तम काम सुरू आहे. जिल्ह्यातील 530 ग्रामपंचायतींनी नोदणी केली असून, यामध्ये कोकण विभागात रायगड जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. सहभागी ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरू करण्यात आली आहेत. सर्व गावांचे गाव कृती आराखडे तयार करून त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य, महिला बचतगट, ग्रामस्थ, सामाजिक संस्था, नेहरु युवा केंद्र, एन.एस.एस., पर्यावरण स्नेही, शिक्षक, विद्यार्थी तसेच विविध घटकांचे योगदान लाभत आहे. – डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड.