मनसेचे मंत्री रवींद्र चव्हाणांना निवेदन
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
मागील 14 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. त्यामुळे पनवेल, पळस्पे ते पोलादपूरपर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झालीय. रस्त्याच्या दुरवस्थेने प्रवाशी जनता, रुग्ण, गर्भवती महिला व वाहनचालकांचे प्रचंड हाल होतात. अशातच या मार्गाला पर्यायी मार्ग असलेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेचा वापर आता रायगड व कोकणवासीय करीत आहेत. मात्र, खालापूर टोलनाक्याला टोलचा नाहक भुर्दंड बसतो, त्यामुळे रायगड जिल्ह्यातील वाहनांना खालापूर टोलनाक्यावर टोलमाफी मिळावी, अशी मागणी मनसे दक्षिण जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांनी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले की, महामार्गाच्या दुरवस्थेने प्रवाशी व वाहनचालक प्रचंड त्रस्त झाले आहेत. यामध्ये साऱ्यांचा वेळ, शारीरिक त्रास आणि वाहनांचे फार मोठे नुकसान होते. हे नुकसान टाळावे यासाठी रायगड जिल्ह्यातील लोक मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेचा पर्याय म्हणून वापर करतात. मात्र, याठिकणी खालापूर टोल नाक्यावर फास्ट ट्रॅक रक्कम असूनही स्कॅन होत नसल्यामुळे विनाकारण टोल जास्त आकारला जातो, त्याचाही भुर्दंड होतो. याठिकाणी लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. सदर टोल नाक्यावर प्रवाशांची अक्षरशः लूट केली जाते. रायगडमधून मुंबईला ये-जा करणाऱ्या वाहनांना टोलमाफी मिळावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
यावेळी देवेंद्र गायकवाड, मनसे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष, सुभाष जाधव रायगड जिल्हा उपाध्यक्ष, संजय गायकवाड जिल्हाध्यक्ष माथाडी सेना, साईनाथ धुळे सचिव रोहा तालुका मनसे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.