आयुष्यमान योजनेकडे रायगडकरांची पाठ

लाभार्थी 22 लाख 90 हजार कार्ड; काढले अवघे पाच लाख जणांनी

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

आयुष्यमान योजनेकडे रायगडकरांनी पाठ फिरवलेली पाहायला मिळत आहे. कारण, जिल्ह्यात 22 लाख 90 हजार लाभार्थी आहेत. मात्र, अवघ्या पाच लाख जणांनीच आयुष्यमान योजनेचे कार्ड काढले आहे. परिणामी, लाभार्थी वाढवण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांची धावाधाव होताना दिसत आहे.

अधिकाधिक लोकांपर्यंत व तळागाळात या योजनेची माहिती न पोहोचणे, जनजागृतीचा अभाव तसेच शासकीय कर्मचारी व अधिकारी यांची अनास्था आदी काही कारणांमुळे आयुष्यमान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. या योजनेचे राज्याचे प्रमुख डॉ. ओम प्रकाश शेट्ये यांनी नुकतेच अलिबागमध्ये आढावा बैठकीत जिल्ह्यातील नागरिकांनी आयुष्यमान योजनेचे कार्ड काढण्याचे आवाहन केले आहे. शिवाय, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना वेतन थांबवण्याचा इशारा दिला आहे. जनजागृती नसल्यामुळे पात्र लाभार्थी शासनाच्या कल्याणकारी योजनेपासून वंचित राहात असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला या कार्डच्या वितरणासाठी व्यापक मोहीम राबवण्याचे निर्देश डॉ. ओम प्रकाश शेट्टी यांनी दिली आहे.

काय आहे योजना?
शासनातर्फे शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सुविधा सुरु केली आहे. गंभीर आजारांच्या उपचारासाठी पाच लाखांपर्यंत आयुष्मान कवच मिळत आहे. याचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड काढणे आवश्यक आहे.
तीन महिन्यांचे टार्गेट
आगामी तीन महिन्यांत 50 टक्के लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड काढण्याचे निर्देश डॉ. शेट्ये यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
चार महिन्यांत 6167 रुग्णांना लाभ
मागील चार महिन्यांत आयुष्यमान भारत योजनेचा रायगड जिल्ह्यातील 6167 रुग्णांना लाभ मिळाला आहे. त्यांना 67 कोटी रुपयांपर्यंतच्या आरोग्य चिकित्सा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
ही रुग्णालये समाविष्ट
जिल्ह्यात 19 रुग्णालय या योजनेत सहभागी आहेत. यामध्ये चार शासकीय, तर पंधरा खासगी रुग्णालयात रुग्णांवर मोफत उपचार होणार आहेत. मात्र, ही रुग्णालय कोठे आहेत, याबाबत अनेक नागरिक अनभिज्ञ आहेत.
कार्ड नसल्यास विम्याचा लाभ मिळवण्यात अडचणी
आयुष्यमान कार्ड नसेल तर पाच लाखांचा आरोग्य विमा मिळविताना अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ज्यांनी हे कार्ड काढले नाही, त्यांनी त्वरित काढून आपला विमा संरक्षित करून घ्यावा, असे आवाहन देखील डॉ. ओमप्रकाश शेट्ये यांनी केले आहे.

पिवळ्या, केशरी आणि पांढर्‍या अशा तिन्ही शिधापत्रिकाधारकांना आयुष्यमान योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. यात शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. आयुष्यमान कार्ड असल्याशिवाय लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे. रेशन दुकानावर आयुष्यमान कार्ड काढण्याची यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

डॉ. ओमप्रकाश शेट्ये,
प्रमुख, आयुष्मान भारत योजना,
महाराष्ट्र

आयुष्यमान योजनेचे कार्ड कुठे मिळते याबाबत अजूनही लोकांना माहिती नाही. या योजनेबरोबरच महात्मा फुले जन आरोग्य योजना व इतर योजनांचा लाभ कसा घ्यावा, याबाबतदेखील जनजागृती नाही. शिवाय, रुग्णांना रुग्णालयात अनेक कागदपत्रे व अटी- शर्तींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना या योजनांचा लाभ घेताना अनेक अडचणी व त्रासाला सामोरे जावे लागते.

ऋषी झा,
तरुण, पाली सुधागड

Exit mobile version