रायगडच्या गोविंदाना दहीहंडीचे वेध

आठ हजार ठिकाणी उभारणार दहीहंडी

| अलिबाग | प्रतिनिधी |

कृष्णजन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला सण रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरा केला जाणार आहे. हा सण अवघ्या 13 दिवसावर येऊन ठेपला आहे. जिल्ह्यामध्ये 8 हजार 193 ठिकाणी दहीहंड्या उभारल्या जाणार आहेत. त्याची तयारी आयोजकांकडून सुरु झाली आहे. ठिकठिकाणी बैठकाही सुरु झाल्या आहेत.

श्रीकृष्ण जन्मानंतर गोपाळकाला 7 सप्टेंबरला साजरा केला जाणार आहे. त्याची तयारी वेगवेगळ्या मंडळासह ग्रामस्थांच्यावतीने सुरु झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून दहीहंडीच्यापार्श्वभूमीवर गावागावात सराव सुरु झाला आहे. त्यात महिलादेखील कमी नसल्याचे दिसून येत आहेत. यंदा रायगड जिल्ह्यामध्ये 8 हजार 193 ठिकाणी दहीहंड्या उभारल्या जाणार आहेत. त्यात सार्वजनिक 1 हजार 863 व खासगी 6 हजार 330 दहीहंड्याचा समावेश आहे. दहीहंडीनिमित्त जिल्ह्यात 176 ठिकाणी मिरवणुका काढल्या जाणार आहेत. काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी दुपारी मिरवणुका काढून पारंपारिक पध्दतीने दहीहंडीचा उत्सव साजरा केला जाणार आहे.

दहीहंडी उत्सवाला अधिक रंगत आणण्यासाठी अभिनेत्री, अभिनेत्यांना आमंत्रित करण्याची तयारीला वेग आला आहे. अलिबागमध्ये शेकाप पुरोगामी संघटना व प्रशांत नाईक मित्र मंडळासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या राजकीय, सामजिक, संस्था संघटनाच्यावतीने व गाव पातळीवर ग्रामस्थ मंडळाच्यावतीने दहीहंडीचा कार्यक्रम ठेवला जाणार आहे. अबालवृध्दांपासून सर्वांच्याच आवडीचा असलेला सण आनंदात साजरा करता यावा यासाठी गाव पातळीवर पोलीसांच्या बैठका सुुरू झाल्या आहेत. मंडळांच्या बैठका घेऊन सण आनंदात साजरा करण्याचे आवाहन केले जात आहे.

Exit mobile version