उत्तर रायगडची सुभेदारी तटकरेंकडे, तर दक्षिण रायगडची गोगावलेंकडे
| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटात शीतयुध्द भडकले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर तोडगा काढल्याचे बोलले जाते. आता रायगड जिल्ह्याला दोन पालकमंत्री मिळणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
मंत्री आदिती तटकरे पालकमंत्री, तर मंत्री गोगवले हे रायगड जिल्ह्याचे सहपालकमंत्री असतील, असा तोडगा निघाल्याकडे सूत्रांनी लक्ष वेधले. मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे उत्तर रायगड आणि मंत्री भरत गोगावले यांच्याकडे दक्षिण रायगडची सुभेदारी दिली जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरुन चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली. रायगडमध्ये आदिती तटकरे यांना पालकमंत्री केल्याने मंत्री भरत गोगावले नाराज झाले होते. त्यांच्या समर्थकांनी रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली होती. मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौर्यावरुन आल्यावर पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार असल्याचे बोलले जात होते. त्यानुसार तोडगा निघाल्याचे बोलले जाते. सहपालकमंत्र्यांना पालकमंत्र्यांइतकेच अधिकार राहणार असल्याने मंत्री गोगावले सहपालकमंत्री पद घेणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.