पाली/बेणसे | प्रतिनिधी |
मदगरूचा बिपी वाढवायला मलेरिया दादूस आयला रं… असं म्हणत रवी जाधव दिग्दर्शित टाईमपास 3 या चित्रपटाचा धम्माल टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्या भागाप्रमाणे तिसर्या भागातही राययगडचा अभिनेता जयेश चव्हाण मलेरियाच्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या गोर गोर आगरी बोलीत प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी तो सज्ज झाला आहे. जयेश रायगड जिल्ह्यातील पनवेलचा रहिवासी आहे.
प्रेक्षकांकडून मिळणार्या प्रतिसादाबद्दल जयेशने सांगितले, टाईमपासमध्ये मी मलेरिया नावाची आगरी तरूणाची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे मला नवी ओळख मिळाली. पुन्हा ही गाजलेली भूमिका साकारायला मिळतेय हे माझे भाग्यच आहे. मी कोकणी असूनही लोक मला आगरी समजतात, जिथे जातो तिथे प्रेमाने दादूस बोलतात. माझ्यासाठी ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. आगरी समाज आणि त्यांच्या भाषेचा खूप आदर आहे. आगरी भाषा शिकण्यासाठी आगरी युवा साहित्यिक सर्वेश तरे यांची मोलाची मदत झाली असेही जयेश म्हणाला.
पहिल्या भागात झळकलेली दगडूच्या मित्रांची गँग पुन्हा आठ वर्षांनी तिसर्या भागात दिसणार आहे. त्यामुळे दगडू आणि पालवी यांच्या लव्हस्टोरीसोबत मित्रांची कॉलेजातील धम्माल यानिमित्ताने अनुभवता येणार आहे. पुन्हा जुन्या टीमसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने आम्ही खूप उत्साहित होतो. रियल लाईफमध्ये देखील आमची मैत्री घट्ट झाली आहे. याचाच प्रत्यय तुम्हाला चित्रपट पाहताना येईल, असे जयेश सांगतो. भूमिकेसाठी जयेशने आठ किलो वजन घटवले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या व्यक्तिरेखेमधील निरागसता जपणे हे माझ्यासाठी खूप मोठे चॅलेंज होते. दिग्दर्शक रवी जाधव आणि लेखक प्रियदर्शन जाधव यांच्यामुळे हे पात्र साकारणे सोपे झाल्याचे त्याने नमूद केले.