रायगडची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

Coronavirus Vaccine bottle Corona Virus COVID-19 Covid vaccines panoramic bottles

जिल्ह्यात उरले फक्त 217 पॉझिटिव्ह रुग्ण
अलिबाग | भारत रांजणकर |
रायगड जिल्ह्यात फक्त 217 कोरोना बाधित रुग्ण शिल्लक राहिले आहेत. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. याच दरम्यान कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेणार्‍यांची संख्या 19 लाख 19 हजार 256 झाली असल्याने नागरिकांमधील कोरोनाची भीती कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र रायगड जिल्ह्यात दिसत आहे.
दुसरी लाट शिखरावर असताना मे-जुन महिन्यामध्ये रायगड जिल्ह्यातील बाधितांची संख्या 16 हजाराच्या आसपास गेली होती. दिवाळीच्या दरम्यान नागरिकांचे व्यवहार सुरळीत सुरु झाले असून सर्व उद्योगधंदे पुर्ण क्षमतेने सुरु झाले आहेत. मागील दीड वर्षात कोरोना महामारीत येथील नागरिकांनी हालाखीचे दिवस काढल्यानंतर आता चित्र बदलत आहे. मात्र, या दीड वर्षात 4 हजार 570 लोकांना आपले जीव गमवावे लागले. तर आतापर्यंत 1 लाख 71 हजार 837 व्यक्तींना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. ज्या वेळेस कोरोनाने जिल्ह्यात प्रवेश केला तेव्हा कोरोनावर उपचार करणारी कोणतीही यंत्रणा जिल्ह्यात उपलब्ध नव्हती. रुग्णांना उपचारासाठी मुंबईत न्यावे लागत असे. आता प्रत्येक तालुक्यात अद्यावत उपचार होत आहेत. सौम्य लक्षणे असणार्‍या रुग्णांवर त्यांच्या राहत्या घरातच उपचार करण्याची मुभा देण्यात आल्यानंतर रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांच्या प्रमाणात खूप घट झाली यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत झाली. पनवेल तालुका वगळता उर्वरीत जिल्ह्यात रुग्णांची संख्या फक्त 107 इतकीच आहे. मुरुड, तळा, सुधागड, पोलादपुर, म्हसळा या तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नाही, उरण, खालापूर, माणगाव, रोहा, महाड, पोलादपूर श्रीवर्धन या तालुक्यांमध्ये एकेरी संख्येत रुग्ण आहेत. रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना नियंत्रणात येण्यासाठी लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहे. पहिला डोस घेणार्‍या नागरिकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 85 टक्क्यापर्यंत गेली आहे. जिल्ह्यातील एकही नागरिक लसीपासून वंचित राहू नये यासाठी मोहिम आखली गेली आहे. नागरिकांना लसीकरणासाठी तयार करण्यासाठी सामाजिक संस्था, प्रशासकीय यंत्रणेची मदत घेतली जात आहे.
-डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी-रायगड

लसीकरणावरील दृष्टीक्षेप
पहिला डोस- 19 लाख 19 हजार 256
दुसरा डोस – 9 लाख 20 हजार 118
पुरुष- 16 लाख 03 हजार 926
स्त्री- 12 लाख 34 हजार 860

मागील आठवड्यातील चाचण्या
आरटीपीसीआर- 38800
अ‍ॅटिजेन टेस्ट – 18466
पॉझिटीव्हीटी रेशो- 1.79
आरटीपीसीआर पॉझिटीव्हीची रेशो- 2.02

उपलब्ध सुविधा
जनरल बेड- 3513
ऑक्सिजन बेड-2575
आयसीयु बेड- 640
व्हेंटीलेटर – 262

Exit mobile version