कबड्डीपटू पूर्वा भगत काळाच्या पडद्याआड
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील ओमकार क्रीडा मंडळाची कबड्डीपटू पूर्वा राजेंद्र भगत (22 ) हिचे अल्पशा आजाराने निधन झाले. प्रतिभावान आणि आश्वासक कबड्डीपटू पूर्वा हिच्या अकस्मात निधनाची बातमी समजताच संपूर्ण क्रीडा जगत हादरले. एक उज्वल भविष्य, उगवता तारा आणि कबड्डी क्षेत्रात मोठं नाव कमावण्याची क्षमता असलेली ही कन्या अचानक आपल्यातून निघून गेल्याची वेदना शब्दात मांडणे कठीण आहे. पूर्वा ही केवळ एक उत्कृष्ट खेळाडू नव्हती, तर कठोर परिश्रम, शिस्त, निष्ठा आणि जिद्दीचं प्रतीक होती. तिची मैदानावरील चपळाई, अचूक खेळ कौशल्य आणि संघासाठी झटणारी वृत्ती अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारी होती. तिच्या कामगिरीतून भविष्यातील मोठी स्वप्नं दिसत होती; परंतु नियतीच्या अनपेक्षित वळणावर तिचा प्रवास थांबला ही अत्यंत दुखद बाब आहे. तिच्या अचानक निधनाने रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कबड्डी विश्वावर शोककळा पसरली आहे. तिच्या आठवणी, तिचा दमदार खेळ आणि तिची निष्ठा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
पूर्वा ही मुळची अलिबाग तालुक्यातील नवखार येथील आहे. मागील 9 वर्षापासून ती ओमकार क्रीडा मंडळाच्या संघातून कबड्डी खेळत होती. उत्तम कोपरारक्षक असलेल्या पूर्वाने आपल्या पकडीच्या जोरावर ओमकार क्रीडा मंडळाला अनेक विजय मिळवून दिले. राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत रायगड जिल्हा जुनियर मुलींच्या संघात पूर्वांची निवड झाली होती. ती एक गुणी खेळाडू होती. तीच्या निधनामुळे जिल्ह्यातील एका गुणी खेळाडूला मुकली आहे. ओमकार क्रीडा मंडळाच्या संघात पोकळी निर्माण झाली आहे. कबड्डीच्या भविष्याला नवी दिशा देऊ शकणारी ही कन्या अशा अचानक गेल्याने संपूर्ण क्रीडा जगत, रायगड जिल्हा आणि तिच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या आठवणी, तिचा धडाकेबाज खेळ आणि तिची मेहनत सदैव प्रेरणा देत राहील.
स्वप्न झाली मातीमोल
एक उज्वल भविष्य, एक उगवता तारा, आणि कबड्डी जगतात अवाढव्य स्थान मिळवण्याची क्षमता असलेली खेळाडू नियतीच्या वळणावर निघून गेली. पूर्वा ही केवळ एक उत्तम कबड्डीपटू नव्हती, तर कठोर परिश्रम, शिस्त, निष्ठा आणि जिद्दीचे जिवंत उदाहरण होती. तिच्या खेळातील अचूकता, मैदानावरील चपळाई आणि संघासाठी झटणारी तिची वृत्ती अनेकांना प्रेरणा देणारी होती. अजून खूप काही साध्य करायचे होते पण तिचा प्रवास इथंच थांबला.







