| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सोळा वर्षाखालील मुलांच्या आंतरजिल्हा दोनदिवसीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघाचा सलामीवीर तंत्रशुद्ध फलंदाज स्वराज गोवारी यांनी दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करत पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या विरुद्ध खेळताना द्विशतक झळकावले आहे.
पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 28.2 षटकांमध्ये अवघ्या 54 धावसंख्येवर संपूर्ण संघ गारद झाला. रायगडचा जलद गती गोलंदाज तनिष्क जातूषकरण यांनी 5 फलंदाजांना बाद केले तर विराज पाटील यांनी 4 गडी टिपले. रायगडच्या संघाने पहिल्या डावात दमदार सुरवात करत सलामीवीर तंत्रशुद्ध फलंदाज स्वराज गोवारी यांनी चौफेर फटकेबाजी करत नाबाद 203 धावा काढत द्विशतक झळकावले. त्याला भव्यम यांनी 58 व आशीर्व पाटील यांनी नाबाद 64 धावा काढून साथ दिली. काल रायगडच्या संघाने 337 धावसंख्येवर एक गडी बाद असताना डाव घोषित केला असून रायगडच्या संघाने पहिल्या डावात 283 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. आज खेळाचा दुसरा व शेवटचा दिवस असल्याने रायगडचा संघ सामना आऊट राईट जिंकतो का यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी रायगडच्या संघाने विलास स्पोर्ट्स अकॅडमी पुणे व स्टार्स क्रिकेट क्लब पुणे संघांवर विजय मिळवला आहे.
एमसीए क्रिकेट स्पर्धेत रायगडच्या स्वराज गोवारीने झळकावले द्विशतक
