| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे निवडण्यात आलेल्या 19 वर्षांखालील मुलींच्या संभाव्य संघात रायगड जिल्ह्यातील अंजली गोडसे, अवनी खंडागळे व अपर्णा गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.



महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे 19 वर्षांखालील मुलींचा संभाव्य संघ निवडण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून निवडण्यात आलेल्या मुलींचे चार संघ तयार करण्यात आले आहेत. त्यांच्यात सामने खेळण्यात येत आहेत. या संघातील खेळाडूंच्या संघांचे एकदिवसीय सराव सामने कोल्हापूर येथे 21 नोव्हेंबरपासून खेळवण्यात येत आहेत. यातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा 19 वर्षाखालील मुलींचा अंतिम संघ निवडण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या संभाव्य संघात निवड झालेल्या रायगडच्या तीनही मुलींचे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते आणि सर्व सदस्यांनी अभिनंदन केले असून, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. चंद्रकांत मते यांच्या प्रयत्नामुळे मागील काही वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील खेळाडूंची विविध गटात महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात निवड होत आहे.







