वासांबे प्रीमियर लीगचे आयोजन; तीनशेहून अधिक खेळाडूंचा लिलाव
| आपटा | वार्ताहर |
वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वासांबे प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यातील दुसर्या आठवड्यात क्रिकेटचा हा थरार रायगडातील क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. त्यासाठी सोमवारी तीनशेहून अधिक खेळाडूंचा लिलाव सोहळा पार पडला. आयपीएलच्या धरतीवर ही स्पर्धा खेळविण्यात येणार असून, 12 संघांचा सहभाग असणार आहे.
दरम्यान, या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. हा सोहळा वरद टावरमध्ये पार पडला. त्याचे उद्घाटन रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दीपक कांबळी, शिवसेनेचे अजू सावंत, चांभार्लीचे माजी उपसरपंच दत्तात्रेय जांभळे ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश गायकवाड, अल्कली अमाईनस कंपनीचे कल्पेश पाटील, सनदी लेखापाल दीपक चौधरी, सुदाम मुंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर खेळाडूंच्या लिलावाला सुरूवात करण्यात आली. यावेळी बारा क्रिकेट संघांचे कर्णधार व संघमालक यांनी तीनशेहून अधिक खेळाडूंवर बोली लावत त्यांना आपापल्या संघात घेतले. रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध समालोचक टी.के. माळी, संतोष चौधरी, रोशन पाटील, निखिल बाबर यांनी उत्तम पद्धतीने या ऑक्शन सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. हे सामने मोहोपाडा येथील अचानक मैदानात डिसेंबर महिन्यातील दुसर्या आठवड्यात होणार आहेत.