आधुनिकतेची जोड देत संस्कृतीचा जागर; वेगवेगळ्या कार्यक्रमांनी रंगला महोत्सव
| पनवेल | प्रतिनिधी |
दिशा कल्चरल इव्हेंट प्रस्तुत, आमदार विक्रांत दादा पाटील प्रतिष्ठान आणि दिशा महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रावण महोत्सव 2026’ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा मंगळवारी (दि.1) पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उत्साहात पार पडला. यावेळी मंगळागौर, फॅशन शो, लावणी, वन मिनिट गेम्स आणि लकी ड्रॉ यामुळे कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते सुरदास गोवारी, रोहिणी साले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (रेल्वे विभाग) विमल बिडवे, डॉ. जयश्री पाटील, माणिक जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आशिमिक कामठे यांनी लावणी व गौळण सादर करून महिलांची मने जिंकली. मंगळागौरच्या पारंपरिक सादरीकरणासह महाराष्ट्राच्या इतिहासातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची झलक सादर करण्यात आली. त्यामुळे मराठमोळी संस्कृती, इतिहास आणि आधुनिकतेचा संगम अनुभवायला मिळाला. फॅशन शोमध्ये महिलांनी आत्मविश्वासाने रॅम्प वॉक करत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. वन मिनिट गेम्स आणि लकी ड्रॉमध्येही महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. लकी ड्रॉमधून पैठणी जिंकण्याची संधी मिळाल्याने कार्यक्रमातील उत्साह आणखी वाढला. तसेच, मंगळागौर स्पर्धेत चंद्रकोर मंगळागौर ग्रुपने प्रथम, गौरीधारी अक्षर ग्रुपने द्वितीय, तर श्रावणसखी मंगळागौर ग्रुपने तृतीय क्रमांक पटकावला. स्वामिनी मंगळागौर ग्रुपला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. फॅशन शोमध्ये जयश्री राठोड विजेत्या ठरल्या. कर्व्ही लूकचा किताब मधुरा दंडवते यांनी पटकावला. डॉ. ललिता पवार गायकवाड प्रथम, तर स्नेहल जगे द्वितीय उपविजेत्या ठरल्या.
दरम्यान, नगरसेविका स्नेहल पाटील आणि मोहिनी पाटील यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून महिलांचा उत्साह वाढविला. दिशा कल्चरल इव्हेंटच्या संस्थापक अध्यक्षा नीलमताई आंधळे आणि दिशा महिला मंचच्या उपाध्यक्षा विद्याताई मोहिते यांच्या पुढाकारातून झालेल्या या महोत्सवाने महिलांना कला, संस्कृती आणि आत्मविश्वास व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. परंपरेला आधुनिकतेची जोड देत मराठमोळ्या संस्कृतीचा जागर करण्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.
