रायगडची जलपरी बँकॉकमध्ये चमकली!

सारा वर्तकने केली सहा सुवर्णपदकांची कमाई; 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये नवा विक्रमाला गवसणी

| चौल | प्रतिनिधी |

वय अवघे आठ वर्ष… समोर आंतरराष्ट्रीय जलतरणपटूंचे आव्हान… पण जिद्द, आत्मविश्वास आणि अथक सरावाच्या जोरावर रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नारंगी-फोफेरी येथील जलपरी साराने थेट बँकॉकच्या जलतरण स्पर्धेत आपल्या प्रतिभेची छाप उमटवली. थायलंडमध्ये झालेल्या आशियाई खुल्या शालेय निमंत्रित जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र ॲक्वाटिक टीम तसेच भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सारा अभिजीत वर्तक हिने तब्बल सहा सुवर्णपदकांची कमाई केली. विशेष म्हणजे, 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये नवा विक्रम नोंदवत साराने आपल्या कामगिरीला विक्रमी झळाळी दिली.

दि. 29 व 30 ऑगस्ट रोजी बँकॉक येथे ही स्पर्धा पार पडली. आठ वर्षांखालील वयोगटात साराने 25 मीटर फ्रीस्टाइल, 50 मीटर फ्रीस्टाइल, 25 मीटर बटरफ्लाय, 25 मीटर बॅकस्ट्रोक, 50 मीटर बॅकस्ट्रोक आणि 100 मीटर बॅकस्ट्रोक या सहा वैयक्तिक प्रकारांत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत सुवर्णपदक पटकावले. साराच्या या यशामागे तिचे प्रशिक्षक रुग्वेद पाटील यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि मेहनत महत्त्वाची ठरली. सराव, तंत्रशुद्ध जलतरण आणि स्पर्धेची तयारी यावर भर देत त्यांनी साराला सातत्याने प्रोत्साहन दिले. सारानेही त्यांच्या मार्गदर्शनाला जिद्द आणि मेहनतीची जोड देत बँकॉकमध्ये सुवर्ण कामगिरी केली. साराचे वडील अभिजीत वर्तक आणि आई वैष्णवी वर्तक पनवेलमध्ये नोकरीनिमित्त स्थायिक असल्याने सारा पनवेलमध्ये पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहे. साराच्या आईवडिलांनी तिच्या या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला. कुटुंबाचे प्रोत्साहन, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि साराची मेहनत यामुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. बँकॉकच्या आंतरराष्ट्रीय जलतरण तलावातून सहा सुवर्णपदके, एक कांस्यपदक आणि एक विक्रम घेऊन परतलेल्या साराने आपल्या क्रीडा प्रवासाची दमदार सुरुवात केली आहे. तिच्या या कामगिरीने कुटुंबीय, प्रशिक्षक, शाळा आणि क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून, भविष्यात साराकडून आणखी मोठ्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

विक्रमाने यशाला चार चाँद!
साराच्या कामगिरीतील सर्वाधिक लक्षवेधी ठरला तो 100 मीटर बॅकस्ट्रोकचा प्रकार. या शर्यतीत तिने नवा विक्रम प्रस्थापित केला. सहा सुवर्णपदकांसोबत विक्रमाची नोंद करत तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या क्षमतेची दमदार चुणूक दाखवून दिली. याशिवाय नऊ वर्षांखालील मिश्र फ्रीस्टाइल रिले संघाने कांस्यपदक पटकावले. या संघाच्या कामगिरीतही साराचा मोलाचा सहभाग राहिला.
साराची पदकांची लयलूट

25 मीटर फ्रीस्टाइल सुवर्ण

50 मीटर फ्रीस्टाइल सुवर्ण

25 मीटर बटरफ्लाय सुवर्ण

25 मीटर बॅकस्ट्रोक सुवर्ण

50 मीटर बॅकस्ट्रोक सुवर्ण

100 मीटर बॅकस्ट्रोक सुवर्ण + नवा विक्रम


बँकॉकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना सहा सुवर्णपदके जिंकता आली आणि 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये विक्रम करता आला, याचा मला खूप आनंद आहे. माझे प्रशिक्षक, आई-बाबा यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि दिलेले प्रोत्साहन हीच माझी मोठी ताकद आहे. यापुढेही आणखी मेहनत करून देशासाठी मोठी कामगिरी करण्याचे माझे स्वप्न आहे.

सारा वर्तक,
जलतरणपटू

साराने एवढ्या लहान वयात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून सहा सुवर्णपदके मिळवणे आणि विक्रम नोंदवणे ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. तिच्या यशामागे प्रशिक्षक रुग्वेद पाटील यांचे मार्गदर्शन, तिची मेहनत आणि सातत्यपूर्ण सराव आहे. साराने अशीच मेहनत करत भविष्यात देशाचे नाव मोठ्या व्यासपीठावर उज्ज्वल करावे, हीच आमची इच्छा आहे.

अभिजीत वर्तक,
साराचे वडील
Exit mobile version