पुरेशा बोग्या उपलब्ध नसल्याने पर्यटकांना त्रास
। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान हे असे देशातील एकमेव पर्यटनस्थळ आहे की जेथील संपूर्ण दैनंदिन जीवन हे पर्यटनावर आधारीत असते. मोटार वाहनांना बंदी असल्यामुळे मिनिट्रेनचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी इथे पर्यटकांची मोठया प्रमाणावर गर्दी होत असते. नेरळ ते माथेरान दरम्यान मिनिट्रेन सेवा अद्यापही सुरू केली नसल्याने अमन लॉज स्टेशन पासून माथेरान स्टेशन या केवळ अडीच किलोमीटर प्रवासाचा आनंद याच मिनिट्रेनच्या शटल सेवेमधून घेण्यासाठी ऐन सुट्ट्यांच्या हंगामात पर्यटकांची तिकिटासाठी गर्दी होत असते. परंतु या शटल सेवेत पुरेशा बोग्या उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अनेक पर्यटकांना शटल सेवेचा लाभ घेता येत नाही.
दुसर्या श्रेणीच्या फक्त तीन बोग्या लावण्यात आलेल्या असून एक बोगी प्रथम श्रेणीसाठी असते त्यामुळे या एकूण चार बोग्यांमध्ये जेमतेम शंभर प्रवाशांची नेे-आण सुरू असते. शटलसाठी प्रथम श्रेणीसाठी 305 रुपये तर द्वितीय श्रेणीसाठी 45 रुपये आकारले जातात. मोठया प्रमाणावर उत्पन्नात वाढ होत असताना सुध्दा या मार्गावर बोग्यांच्या संख्येत वाढ केली जात नाही. त्यामुळे अनेकांना या शटल सेवेचा लाभ घेता येत नाही. त्यांना नाईलाजाने घोडा किंवा हातरीक्षाचा आधार घेऊन अवाजवी रक्कम मोजून दस्तुरी कार पार्किंग गाठावे लागत आहे. याकामी रेल्वेच्या संबंधीत अधिकारी वर्गाला केव्हा जाग येणार असे पर्यटकांमधून बोलले जात आहे.
प्रचंड गर्दीमुळे आणि गाडीच्या अपुर्या बोग्यांची संख्या त्यामुळे आम्हाला तिकीट उपलब्ध झाले नाही. आमच्या सामानासह माथेरान पर्यंत येताना खूपच दमछाक झाली रेल्वेच्या अधिकार्यांनी याबाबत ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
जयप्रकाश वायंगने, पर्यटक मुंबई