| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेल रेल्वे स्थानकावरील रेल्वे पूल धोकादायक झाला होता. अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी हे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. यानंतर जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाकडून पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने पुलाचा अर्धा भाग पादचार्यांसाठी बंद करण्यात आला आहे.
पनवेल रेल्वे स्थानकावर पनवेल शहराला नवीन पनवेल शहराला जोडण्यासाठी रेल्वे पूल बांधण्यात आलेला आहे. रहदारीच्या वेळी रेल्वे पुलावर प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. प्रवाशांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या पुलाचे 2019 पासून कोणत्याही प्रकारचे ऑडिट करण्यात आलेले नव्हते. रेल्वे पुलाखालून मालगाडी गेल्यास पुलाला हादरे बसत असून, पुलाला आधार देण्यासाठी बसवण्यात आलेले लोखंडी खांबदेखील गंजल्याने रेल्वे पुलाला अपघात होऊन पादचार्यांना याचा फटका बसू शकतो, हे लक्षात आल्याने नवीन पनवेल मधील आश्वाथामा जेष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी रेल्वे अधिकार्यांची भेट घेऊन रेल्वे पूल दुरुस्ती करण्याची मागणी केली. ज्येष्ठ नागरिक संघाच्या मागणीनंतरही दुरुस्ती कामाकडे दुर्लक्ष करणार्या रेल्वे अधिकार्यांनी केलेल्या पाहणीत पूल धोकादायक असल्याचे आढळून आल्याने अखेर पुलाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात करण्यात आल्याने सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे.