| पनवेल | प्रतिनिधी |
रेल्वे स्थानकावर एका प्रवाशासाठी रेल्वे कर्मचारी देवदूत ठरले आहेत. चालत्या गाडीत चढण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या फटीत पडलेल्या प्रवाशाला रेल्वे कर्मचाऱ्यांनी अत्यंत धाडसाने आणि तत्परतेने मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले आहेत. या थरारक घटनेमुळे स्थानकावर काही काळ प्रवाशांच्या हृदयाचे ठोके चुकण्याची वेळ आली होती; परंतु, येथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या प्रवाशाचे प्राण वाचताच प्रवाशांनी या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
दादर-तिरुनेलवेली एक्स्प्रेस पनवेल स्थानकावर थांबली होती. गाडी सुटत असताना एका प्रवाशाने घाईघाईने जनरल डब्यात चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक पाय घसरल्याने त्याचा तोल गेला आणि तो थेट प्लॅटफॉर्म व धावत्या रेल्वेमधील अरुंद फटीत अडकला. हा प्रकार पाहताच आसपासच्या प्रवाशांनी मोठ्याने ओरडण्यास सुरुवात केली. हा आवाज ऐकून कोकण रेल्वेचे फिरते तिकीट निरीक्षक महेश कांबळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता ऑन ड्युटी गार्डना गाडी थांबवण्याचा इशारा दिला. त्यानंतर जीवाची बाजी लावून फटीत अडकलेल्या प्रवाशाला सुरक्षितपणे बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत या प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही. दरम्यान, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी तातडीने मदतीचा हात देत या प्रवाशाला प्लॅटफॉर्मवर आणल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील तपासणीसाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रवाशांनी धावत्या गाडीत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये. आपले आयुष्य मौल्यवान आहे, त्यामुळे रेल्वे पूर्ण थांबल्यानंतरच डब्यात प्रवेश करावा, असे आवाहन कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.
मृत्यूच्या दाढेतून प्रवाशाला काढले सुखरूप बाहेर

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606