| पनवेल | वार्ताहर |
गाढेश्वर धरणाच्या परिसरात पोहण्यास गेलेल्या व पाण्याच्या प्रवाहात अडकून वाहत चाललेल्या दोघांसाठी पनवेल तालुका पोलीस देवदूत ठरले असून, पनवेल तालुका पोलिसांनी प्रसंगावधान राखत मृत्यूच्या दाढेतून या दोघांना सुखरूप बाहेर काढले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे विविध स्तरांतून कौतुक केले जात आहे.
पनवेल तालुका पोलिस ठाणे हद्दीतील नेरे बीटमध्ये पोलिस गस्त घालत असताना गाढेश्वर नदीपात्रात सोहेल खावजौद्दिन अहमद शेख व मनोज शंकर गांगुर्डे हे दोघेजण पाण्याच्या जोरदार प्रवाहातवाहत जाऊन पाण्यात अडकल्याचे पोलिसांना दिसले. सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद फडतरे, तुकाराम कोरडे, संदीप पाटील, धनंजय पठारे, कांबळे, जाधव यांनी तत्काळ दोरीच्या साहाय्याने या दोघांना सुखरूप बाहेर काढले. तसेच यावेळी पोलिसांनी अतिउत्साह टाळण्याचे आणि सतर्कतेचे आव्हान केले आहे.
पर्यटकांनी वर्षासहलीसाठी येताना त्या भागातली पूर्ण माहिती घ्यावी तसेच विविध पर्यटनस्थळी पोलिसांनी सूचनाफलक लावले आहेत. त्या सूचनांचे योग्य पालन करावे,असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यानी केले आहे.