| मुंबई | वृत्तसंस्था |
धावतपळत लोकल अथवा रेल्वेगाडी पकडण्याच्या प्रयत्नात प्रवासी पडतात आणि फलाट व रेल्वेगाडीच्या पायदानाच्या मोकळ्या जागेत अडकतात. काही प्रवासी आत्महत्या करण्यासाठी रेल्वेगाडीसमोर उभे राहतात. मात्र, प्रसंगावधानता राखून आरपीएफ जवान अशा प्रवाशांचे प्राण वाचवितात. मध्य रेल्वेच्या आरपीएफ विभागाला एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत अशा 66 प्रवाशांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ, सोलापूर आणि नागपूर या पाच विभागांमधील रेल्वे सुरक्षा दलात (आरपीएफ) मिशन जीवन रक्षक सुरू आहे. यासह पळून गेलेल्या लहान मुलांची घरवापसी करणे, विसराळू प्रवाशांचे साहित्य शोधून देण्याचे कर्तव्य पार पाडले जाते. एप्रिल ते ऑक्टोबर या चालू आर्थिक वर्षात ऑपरेशन अमानत अंतर्गत आरपीएफने सुमारे 857 प्रवाशांचे 2.77 कोटी रुपये किंमतीचे सामान परत मिळवून दिले. या 857 प्रवाशांपैकी 377 प्रवाशांचे 1.63 कोटी रुपये किंमतीचे सामान एकट्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात परत मिळवण्यात आले. या सामान पुनर्प्राप्ती प्रकरणांमध्ये बॅग, मोबाइल, पर्स, लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.
मिशन जीवन रक्षकचा एक भाग म्हणून आरपीएफ जवानांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून 66 जणांचे प्राण वाचवले. यामध्ये मुंबई विभागातील 19, भुसावळ विभागातील 13, नागपूर विभागातील 14, सोलापूर विभागातील 5, पुणे विभागातील 15 जणांचा समावेश आहे. आरपीएफच्या जवानांनी सतर्क राहून प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.