कर्जत तालुक्यात वादळी वार्‍यासह पाऊस आणि गारपीट

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात सलग तिसर्‍या दिवशी वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. आज लोकसभा निवडणुकीचे मतदान असताना मोठ्या प्रमाणावर दुपारी दीड ते दोन तास पावसाने हजेरी लावली आणि मतदानाचे तीनतेरा वाजले. दरम्यान,अवकाळी पावसामुळे कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान आणि झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

कर्जत तालुक्यात आज सोमवारी दुपारी दीड वाजल्यापासून अवकाळी पावसाने सुरुवात केली. सुरुवातीला हा पाऊस खांडस आणि ओलमन भागातून कशेळे भागात आला. त्याचवेळी तो कळंब भागातून नेरळकडे आणि कर्जत भागात पोहोचला. संध्याकाळी साडेचार वाजता हा पाऊस थांबला. मात्र, त्या अवकाळी पावसाने कर्जत तालुक्यातील सर्व जनजीवन थांबले होते. कर्जत तालुक्यातील बहुसंख्य रस्त्यांवर वाहनांची वर्दळ थांबली आणि रस्त्यावर गोळा झालेल्या पावसामुळे अल्प वाहनांची वाहतूकदेखील मंदगतीने सुरू होती. या अवकाळी पावसासोबत जिते परिसरात गारांचा पाऊस झाला.

मात्र, या काळात मोठ्या प्रमाणावर वादळी वार्‍यासह पाऊस सुरू होता आणि त्यात असंख्य झाडे उन्मळून तसेच झाडांच्या महाकाय फांद्या तुटून घरांचे नुकसान झाले. तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान वादळी वार्‍याने केले आहे. त्याचवेळी नेरळ कळंब रस्त्यावरील अवसरे गावाजवळ रस्त्यावर असलेले झाड कोसळले. त्याचवेळी कळंब वांगणी रस्त्यावर असलेल्या आरडे गावाच्या रस्त्यावर झाड कोसळले आणि रस्त्यावर आलेलो एसटीची गाडी अडकून पडली. तर कर्जत कल्याण राज्य मार्ग रस्त्यावर कोषाने येथेदेखील झाड रस्त्यावर कोसळल्याने रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. वातावरणात या अवकाळी पावसाने गारवा निर्माण झाला असून, भाजीपाला शेती आणि वीटभट्टी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

Exit mobile version