पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला

बुधवारी जिल्ह्यात यलो अलर्टचा इशारा

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

भातलागवडीची कामे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून, आतापर्यंत सुमारे 60 टक्के लागवड पूर्ण झाली आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने लागवडीच्या कामांना अपेक्षित गती मिळत नव्हती. अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर मंगळवारी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने शेतकरी सुखावला आहे. बुधवारीही पावसाचा अंदाज असून, हवामान विभागाने यलो अलर्टचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

यंदा पाऊस सुमारे पंधरा दिवस उशिरा दाखल झाल्याने भातलागवडीची कामेही जवळपास एक महिना लांबली. कधी ऊन तर कधी पाऊस, अशा वातावरणामुळे शेतकरी चिंतेत होता. दुबार पेरणी केलेली रोपे लागवडीयोग्य होण्यास अडथळे निर्माण झाले होते. तयार झालेल्या रोपांसाठी शेतांमध्ये पुरेसे पाणी नसल्याने लागवड लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.

अखेर मंगळवारी (दि. 11) सकाळी अकरानंतर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. सकाळपासून सुरू झालेला पाऊस संध्याकाळपर्यंत कायम होता. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असली तरी अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस सुरू झाल्याने शेतकरी मात्र सुखावला. त्यामुळे भातलागवडीच्या कामांना आता वेग येण्याची शक्यता आहे. बुधवारीही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज असून, 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Exit mobile version