हवामान खात्याकडून यलो अलर्टचा इशारा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. कधी कडक ऊन, तर कधी ढगाळ वातावरण, तर कधी पावसाची रिपरिप सुरू आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्यामध्ये धोक्याचे असून, भारतीय हवामान खात्याने यलो अलर्टचा इशारा दिला आहे. या कालावधीत तापमानात प्रचंड वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण उन्हामध्ये फिरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कडक उन्हामुळे बाहेर पडणे नकोसे होत आहे. डोळ्यांना त्रास होण्याबरोबरच डोकेदुखीदेखील वाढत आहे. या उन्हापासून बचाव करण्यासाठी मफलर, टोपीसह गॉगलचा वापर केला जात आहे. काही ठिकाणी नागरिक शीतपेय, नारळ पाणी घेऊन शरीरात गारवा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागील चार दिवसांपूर्वी जिल्हयातील अलिबागसह पनवेल, दक्षिण रायगडमध्ये अवकाळी पाऊस पडला. हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिक सुखावून गेले होते. त्यानंतर तापमानात प्रचंड वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यामध्ये 26 एप्रिलपर्यंत यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी, तापमानात वाढ होऊन उष्णता वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, उष्माघातापासून बचाव करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. उष्ण व दमट हवामानाची शक्यता जिल्ह्यातील अनेक भागात निर्माण होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.







