| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रशांत आंबी यांना अर्वाच्च शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या, आमदार संजय गायकवाड याला अटक करा! या मागणीकरिता गाव, तालुका, जिल्हास्तरावर स्वतंत्रपणे व शक्य त्या ठिकाणी डाव्या पुरोगामी समविचारी पक्ष संघटनांनी एकत्र यावे, असे आवाहन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले आहे.
कॉ. गोविंद पानसरे यांनी 1988 मध्ये लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांना साक्षात्कार झाला आहे. प्रकाशक प्रशांत आंबी यांच्याशी रात्रीच्यावेळी संपर्क साधून त्यांना शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. कॉ. पानसरे यांच्याबाबतही अपशब्द बोलण्यात आले. शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याने शेतकरी कामगार पक्षासह वेगवेगळ्या संस्था, संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत शेतकरी कामगार पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना शिंदे गटातील आमदार प्रशांत गायकवाड यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळी केली. आमदार असून घरात घुसून चिरडून टाकू, अशी जीवेठार मारण्याची धमकी दिली. गायकवाड यांच्या वक्तव्याने शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला असून, गायकवाड यांच्याविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीदेखील गृह विभागाकडे केली आहे. गायकवाड यांच्या गुंडगिरीची सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. प्रशांत आंबी यांना अर्वाच्च शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या, आमदार संजय गायकवाड याला अटक करा या मागणीकरिता गाव, तालुका, जिल्हास्तरावर स्वतंत्रपणे व शक्य त्या ठिकाणी डाव्या पुरोगामी समविचारी पक्ष संघटनांना सोबत घेऊन निषेध करा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.
गायकवाडांना अटक करा : सुरेश खैरे
स्वराज्य संस्थापक, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची खरी ओळख विशद करणारे ‘शिवाजी कोण होता?' हे पुस्तक कॉ. गोविंद पानसरे यांनी 40 वर्षांपूर्वी मराठीत लिहिले असून, आजमितीपर्यंत भारतातील अनेक भाषांत ते भाषांतरित होऊन ते प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत. देशातील दिग्गज विद्वान, अभ्यासक आणि चळवळीतील जाणत्या कार्यकर्त्यांनी हे पुस्तक वाचले, अभ्यासले असून, हे पुस्तक शिवाजी महाराजांची खरी ओळख विशद करते, असा स्पष्ट निर्वाळा देताना ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे, अशी शिफारस केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त दिवंगत न्यायाधीश पी.बी. सावंत यांची पत्ररूपी प्रतिक्रिया तर या पुस्तकाच्या सुरुवातीलाच प्रसिद्ध केली आहे.
सदरचे पुस्तक न वाचता केवळ त्याचे शीर्षक पाहून पुस्तकाचे कोल्हापूरस्थित कार्यकर्ते प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड याने, आई-बहिणींचा उद्धार करणारी अर्वाच्च शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली, ही बाब अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह असून, आमदार संजय गायकवाड याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून, अटक करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने करण्यात येत असल्याचे शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी सांगितले.
गायकवाडांवर कारवाई करा : चित्रलेखा पाटील
‘शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या शीर्षकावर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यावर अर्वाच्च भाषा वापरली आहे. याबाबत शेतकरी कामगार पक्षाकडून निषेध व्यक्त केला जात आहे. लोकशाही व व्यक्ती स्वातंत्र्यावर घात असून, गायकवाड यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केली आहे.







