| कर्जत | प्रतिनिधी |
कोंदिवडे येथील शाळकरी मुलींनी गावातील खराब रस्त्यांची दयनीय अवस्था आपल्या अनोख्या आणि उपरोधिक शैलीत मांडणारा व्हिडीओ तयार केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यांच्या धाडसी आणि निर्भीड भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या व्हिडीओची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या मुलींची भेट घेतली.
यावेळी राज ठाकरे यांनी नेहा घारे, ज्योत्स्ना मुकणे, मानसी पवार या मुलींशी संवाद साधत त्यांच्या धाडसाचे, सामाजिक प्रश्न मांडण्याच्या पद्धतीचे आणि जनतेच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याच्या प्रयत्नाचे कौतुक केले. तसेच सर्व मुलींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रसन्न बनसोडे, जितेंद्र पाटील, भूषण राणे, सुयश महागावकर कर्जत यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.






