अंकुरलेल्या पिकांना पावसाचा दिलासा

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

शेतकऱ्यांनी पावसाच्या आगमनानंतर खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात केली असून, शेतात पेरलेल्या बियाण्यांना चांगला अंकुर फुटला आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी बरसलेला पाऊस अचानक थांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. अंकुरलेल्या पिकांना पुढील वाढीसाठी पावसाची अत्यंत गरज असताना पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती.

दरम्यान, आज पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

सध्या पिकांच्या वाढीसाठी नियमित आणि समाधानकारक पावसाची आवश्यकता आहे. पाऊस अधूनमधून पडून पुन्हा खंड पडत असल्याने शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. यामुळे यंदा पावसाने सातत्याने आणि जोरदार बरसून खरीप हंगामाला बळ द्यावे, तसेच शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज व्हावे, अशी प्रार्थना बळीराजा वरुणराजाकडे करत आहे.

तालुक्यात औद्योगिक कारणांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असले तरी सुद्धा, शेतकरी मोठ्या प्रमाणात शेती करीत आहे. गुरांसाठी वैरण तसेच धान्याची कमतरता पडू नये, यासाठी आजही तालुक्यातील शेतकरी शेती करण्याकडे भर देत आहे. मात्र, हे सर्व वरुण राज्यावर अवलंबून असतो. सुरुवातीला बरसणारा पाऊस आणि शेवटच्या क्षणाला जात असलेला पाऊस शेतीचे मोठे नुकसान करीत आहे. मात्र, असे असले तरीसुद्धा शेतकरी त्या वरुण राज्यावर भरवसा ठेवून शेती करीत असतो.

Exit mobile version