। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल-जेएनपीटी मार्गावरील जांभुळपाडा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातानंतर त्यांना धडक देणाऱ्या वाहनचालकाने पलायन केले असून, पनवेल शहर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या अपघातातील दोन्ही मृत व्यक्तींची ओळख पटली नसल्याने पोलिसांनी त्यांची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या अपघातात मरण पावलेले दोन्ही व्यक्ती पनवेल-जेएनपीटी मार्गावरील जांभुळपाडा येथून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. दोघेही गंभीर जखमी झाल्याने पोलिसांनी त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला.






