मेलबर्नमध्ये पावसानंतर कडकडीत ऊन
| सिडनी | वृत्तसंस्था |
टी-20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत. दरम्यान, या महामुकाबल्यावेळी पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणात असल्याने दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला होता. मेलबर्न येथे होणार्या या सामन्यात हवामान खात्याने सर्वप्रथम पावसाचा अंदाज वर्तवला होता. पण आता मेलबर्नमध्ये बराच वेळानंतर पाऊस थांबला असून, कडकडीत सूर्यप्रकाश पडला आहे. त्यामुळे सामन्यादिवशी अर्थात उद्याही पावसाची शक्यता खूपच कमी आहे.

मेलबर्नमध्ये आज म्हणजेच शनिवारी सकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला आणि आकाश ढगाळ झाले होते, त्यामुळे रविवारी भारत-पाकिस्तान सामन्यावेळीही मुसळधार पाऊस पडेल, असं वाटत होतं. पण मेलबर्नच्या हवामानात अचानक बदल झाला आणि पाऊस थांबून ऊनही पडलं आहे. दरम्यान, Weather.com ने आधी दिलेल्या माहितीनुसार मेलबर्नमध्ये 23 ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता 80 टक्क्यांहून अधिक होती. पण, आता हवामानात बदल झाल्यानंतर तेथे पावसाची 25 टक्के शक्यताच असल्याने सामना वेळेत आणि संपूर्ण ओव्हर्सचा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सामना रद्द झाल्यास
साखळी सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे जर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला आणि सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना 2 गुण वाटून दिले जातील.
भारत वरचढ
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये एकूण सहा सामने खेळले गेले आहेत. या सहा सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये भारतीय संघ वरचढ ठरला आहे, तर एका सामन्यात पाकिस्तान संघाने विजय मिळविला आहे. 2007 चा अंतिम सामना, 2012, 2014, 2016 मध्ये भारत विजयी झाला असून, 2021 विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तान संघाचा भारताविरुद्धचा पहिला विजय आहे.